लासलगावला पपईची आवक वाढली
By admin | Published: November 3, 2015 10:18 PM2015-11-03T22:18:34+5:302015-11-03T22:19:17+5:30
लासलगावला पपईची आवक वाढली
लासलगाव : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समिती आवारात सोमवारी पपईची आवक झाल्याने पपईचाही येथे लिलाव करण्यात आला. येथे पपईची आवक सुरू झाल्याने धान्य उत्पादनांसोबतच टमाटे व इतर भाजीपाला पिकांसह डाळींब व पपईसारख्या फळविक्रीसाठी ही बाजारपेठ नावारूपास येत असल्याचे बाजार समिती सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
बाजार समिती आवारात सोमवारी सोमठाण येथील शेतकरी वसंत घनघाव यांनी ४७ क्रेट्स पपई विक्रीसाठी आणली होती. पपईचा डाळींब खरेदीदारांनी वेगळा लिलाव केला.
तत्पूर्वी लासलगाव टमाटा व्हेजिटेबल अॅण्ड फ्रुट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते पपई क्रेट्सचे पूजन झाल्यानंतर पपईचा लिलाव पुकारण्यात
आला. यावेळी मदीना फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल कंपनीच्या अडतीत मोहसीन शेख यांनी १,००१ रुपये प्रति क्विंटल दराने पपईची खरेदी केली. याप्रसंगी डाळींब खरेदीदार मधुकर गावडे, मनोज गोरडे, पापा पठाण, शादाब शेख, सुनील शिंदे, मनोज माठा, क्षितिज माठा, बाजार समितीचे मुख्य लिपिक सुरेश विखे, प्रभारी हिरालाल सोनारे, अरुण माळी यांच्यासह डाळींब उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.
येथील बाजार समिती आवारात पपईसोबतच चिकू, सीताफळ, पेरू, बोर आदि शेतमाल प्रतवारी करून विक्रीस आणल्यास या पिकांचाही लिलाव करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी येथे आपला माल विक्रीस आणण्याचे आवाहन टोमॅटो व्हेजिटेबल अॅण्ड फ्रुट असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)