लासलगावी दोन्ही संस्थांना कांदा खरेदीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 PM2021-06-04T16:13:26+5:302021-06-04T16:13:53+5:30
लासलगाव : नाफेडच्या वतीने नोडल एजन्सी म्हणून विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्था व लासलगावच्या व्हेफको संस्थेला मान्यता दिली असल्याचे कागदपत्र पडताळणीत स्पष्ट झाल्यानंतर दोन्हीही संस्थांना शुक्रवारी (दि.४) झालेल्या बैठकीत लासलगाव बाजार समितीत कांदा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. सदर तिढा सुटल्यानंतर सकाळच्या सत्रात कांदा लिलाव झाले.

लासलगाव येथील बाजार समिती आवारात गुरूवारी (दि.३) नाफेडचे वतीने एजन्सी मिळालेल्या विंचुर येथील कृषी साधना शेतीमाल उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने श्रीमती साधना जाधव यांनी कांदा खरेदीसाठी बोली लावली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सदर संस्थेकडे अधिकृत परवाना नसल्याचे कारण दर्शवत लिलाव बंद पाडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसह बाजार समिती प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक होऊन दोन्ही संस्थांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच त्यांना लिलावात सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, शुक्रवारी (दि.४) बाजार समितीत झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांना अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता असल्याने त्यांना कांदा खरेदी लिलावासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला बाजार समिती सभापती सौ, सुवर्णा जगताप , सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह संचालक रमेश पालवे, कृषी साधना संस्थेच्या साधना जाधव, व्यापारी वर्गाचे वतीने नंदकुमार डागा, नितीन जैन, मनोज रेदासणी, बाळासाहेब दराडे, हेमंत राका, विवेक चोथाणी व प्रविण कदम उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या लिलावात सकाळी २७ हजार क्विंटल कांदा आवक होऊन भाव ७०० ते २१९१ व सरासरी १८२५ रूपये जाहीर झाले.