लासलगावी शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:52 PM2020-02-07T16:52:32+5:302020-02-07T16:53:05+5:30

कांदा निर्यात बंदी हटवा : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले

 Lasalgaon farmers 'Sholay style' agitation | लासलगावी शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

लासलगावी शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Next
ठळक मुद्देकांदा दरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत

नाशिक : कांदा दरात होत असलेली घसरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवावी या मागणीसाठी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी लासलगाव येथील बाजार समिती आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा पवित्रा प्रारंभी या शेतक-यांनी घेतला परंतु, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक अर्धा तासांनी टाकीवरुन खाली उतरले.
गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने मोठ्या प्रमाणावर घसरण होत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. त्यातच सरकारने लावलेल्या निर्यातबंदीमुळे शेतक-यांच्या संकटात अधिक भर पडली आहे. सदर निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतक-यांकडून मागणी केली जात आहे. त्यासंबंधी खासदारांसह बाजार समितीच्या पदाधिका-यांनीही केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत निवेदने दिली आहेत. परंतु, सरकारने फक्त कृष्णपूरम कांदद्याला निर्यातीची परवानगी दिल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे शुक्रवारी (दि.७) कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी राज्य कांदा उत्पादकांची संघटना, प्रहार शेतकरी संघटना व जय किसान फोरम यांच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांसह बाजार समिती आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढत शोलेस्टाईल आंदोलन केले. राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे, गणेश निंबाळकर तसेच निवृत्ती न्याहारकर यांच्यासह प्रकाश चव्हाण, उध्दव न्याहारकर, आनंद भोसले , सागर पूरकर, हरी ठाकरे, शंकर गायखे, महेश भोसले, शिवाजी न्याहारकर, खंडू न्याहारकर , खंडु गांगुर्डे, निळोबा न्याहारकर, गोकुळ न्याहारकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

अर्धा तास आंदोलन
शेतक-यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करताच बाजार समितीचे प्रशासन व पोलिसांची धावपळ उडाली. दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवेदन घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर.एस सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर अर्धा तासांनी आंदोलक खाली उतरले.

Web Title:  Lasalgaon farmers 'Sholay style' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.