लासलगावी कांदा दरात उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:58 PM2021-02-22T23:58:35+5:302021-02-23T00:00:52+5:30
लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सोमवारी (दि. २२) चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होणार असल्याने ग्राहकांना तोपर्यंत चढ्या भावानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
लासलगाव : देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव सोमवारी (दि. २२) चार हजार रुपयांच्या वर गेल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची बंपर आवक बाजार समित्यांमध्ये दाखल होणार असल्याने ग्राहकांना तोपर्यंत चढ्या भावानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे लेट खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीसाठी येत असताना ५० टक्क्यांनी घटल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव चार हजार रुपयांच्या वर गेले. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ८ लाख ४० हजार ५५५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्याला कमीत कमी ८०० रुपये , जास्तीत जास्त २८४७ रुपये तर सर्वसाधारण १९३९ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला होता.
यंदा मात्र कांद्याला चांगला बाजारभाव असला तरी गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका लेट खरीप कांद्याला बसल्यामुळे कांद्याचे रोप वाया गेले होते. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. याचा परिणाम होत लेट खरीप लाल कांद्याची आवक घटली. आता २२ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ७ हजार ९३८ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमीत कमी ८००, जास्तीत जास्त ४५०० तर सर्वसाधारण ३५१६ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. येणाऱ्या दिवसात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्यानंतर वाढलेले कांद्याचे बाजारभाव स्थिर होत ग्राहकांना दिलासा मिळेल, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.
कांद्याच्या बाजारभावात आज जरी वाढ दिसत असली तरी केंद्र सरकारने कुठलेही निर्णय घेत कांद्यावर निर्बंध लादू नयेत. गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे तसेच गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीही अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी उन्हाळ कांद्याला फटका बसल्याने कांद्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे आज जरी कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसत असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून काही फायदा होणार नाही.
- भारत दिघोळे, कांदा उत्पादक शेतकरी
का वाढले कांद्याचे भाव?
१) मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पर्यटनाला मिळालेली चालना.
२) हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये कांद्याच्या मागणीत झालेली वाढ.
३) निर्यात खुली असल्याने मागणीच्या तुलनेत कांद्याचा देशांतर्गत पुरवठा घटला.