लासलगावकरांना हिरवट पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:23 PM2019-06-07T16:23:26+5:302019-06-07T16:23:39+5:30
नांदूरमध्यमेश्वर धरणात शेवाळ आणि पानवेलीमुळे दुर्गंधी
लासलगाव : नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या पाणी उपसा होत असून पाटबंधारे विभागाचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पानवेली आणि शेवाळ साचून लासलगावसह १६ गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे पाईपलाइनवर दबाव येऊन ती फुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होताना दिसून येत आहे.
लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना विविध समस्येच्या विळख्यात अडकलेली आहे. १६ गाव पाणी पुरवठा समितीने शासनाकडून या योजनेच्या दुरुस्तीकामासाठी २ कोटी रु पये मिळावेत म्हणून प्रयत्न केले परंतु शासनाने केवळ ११.३० लाख रु पये मंजूर केलेले आहे. योजनेसाठी वापरलेले पाईप मोठ्या प्रमाणावर जीर्ण झाल्याने पाईपलाईनवर दबाव (प्रेशर) येऊन त्या वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत. नांदूरमध्यमेश्वर धरणामध्ये 10 मे रोजी पाणी साठा करून देण्यात आला. परंतु, पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी चोरी होत असून अवैधरीत्या उपसा होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे जून महिन्यात पाणी पुरवठा करणे समितीस अवघड होणार आहे. सदर धरणातील पानवेली पाटबंधारे विभागाने न काढल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित होत आहे. सदर योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी किंवा समितीस निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा विधानसभा निवडणुकीवर लासलगाव विंचूर सह १६ गावे बहिष्कार टाकतील असा इशारा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिला आहे.