लासलगावचा भेळभत्ता आता किराणा दुकानातून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:15 PM2020-04-03T22:15:32+5:302020-04-03T22:19:38+5:30
लॉकडाउनमुळे येथील भेळभत्ता विक्रीची दुकाने दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने विक्रेत्यांनी आता किराणा दुकानांचा आधार घेतला आहे. दुकानातून हा भेळभत्ता पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लासलगाव : लॉकडाउनमुळे येथील भेळभत्ता विक्रीची दुकाने दहा-बारा दिवसांपासून बंद असल्याने विक्रेत्यांनी आता किराणा दुकानांचा आधार घेतला आहे. दुकानातून हा भेळभत्ता पॅकिंगमध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लासलगाव शहर कांद्याच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध आहेच, शिवाय तेथील भेळभत्ताही खवय्यांची खास पसंती राहिली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही या भेळभत्त्याचे शौकीन आहेत. कांदा अगर शेतमाल विक्र ीनंतर शेतकरी येथील भेळभत्ता घेऊनच घरी जातात. मात्र आठ-दहा दिवसांपासून ही दुकाने बंद आहेत.
चौकोनी कापलेला कांदा व उकडलेली मिरची आणि त्यावर लिंबू पिळून दिला जाणारा हा भेळभत्ता आता घराघरात सक्तीने कोंडल्या गेलेल्या लोकांनाही खुणावतो आहे. शहरात लालाजी, अंबिका, जगदंबा, दत्तूभाऊचा अंबिका, चिंतामणचा भत्ता, सावजी भत्ता यासह आता नव्या रूपात नरेंद परदेशी यांनी पॉलिपॅकमधील भत्ता विक्र ीस आणला आहे.
जवळपास दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणारा भेळभत्ता लॉकडाउनमुळे मिळत नाही. त्यामुळे खवय्ये नाराज होते; परंतु आता हाच भेळभत्ता पॅकिंगमध्ये किराणा दुकानात विक्र ीस उपलब्ध झाला आहे. त्यास ग्राहकांची चांगली मागणी व पसंती आहे, असे हरीषकुमार किराणा स्टोअर्सचे मालक व्यवहारे बंधू यांनी सांगितले.