२५० गुन्हेगारांना सुधारण्याची शेवटची संधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:59+5:302021-06-28T04:11:59+5:30
पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत शहरातील दोन्ही परिमंडळातील चारही विभागांच्या १३ पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत ...
पोलीस आयुक्तालयाकडून गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत शहरातील दोन्ही परिमंडळातील चारही विभागांच्या १३ पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत सामान्य नागरिकांप्रमाणे वर्तणूक करुन मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांना वाट खुली करुन दिली आहे. या योजनेचा लाभ देत सुमारे २५० गुन्हेगारांकडून बंधपत्र घेत त्यांना गुन्हेगारीचा मार्ग सोडण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.
शहरात गेल्या मंगळवारपासून (दि.२२) गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत विविध पोलीस ठाण्यांचा एकत्रित उपक्रम घेतला जात आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या तीन गुन्हेगार सुधार मेळाव्यांमध्ये उपस्थित राहिलेल्या गुन्हेगारांपैकी एकुण २५० गुन्हेगारांनी चांगले वर्तन करणार असल्याचे बंधपत्र पोलिसांकडे लिहून दिले आहे. यामध्ये शहरातील विभाग-१मधील ६९, विभाग-२मधील ६४, विभाग-३मधील ५४ आणि विभाग-४मधील ६३ गुन्हेगारांनी गुन्हेगारीच्या मार्गावर आता यापुढे चालणार नसल्याचे लेखी वचन पोलिसांना दिले आहे.
--इन्फो--
‘वॉच’ ठेवण्यात येईल
पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची यादी तयार आहे. ज्या गुन्हेगारांनी बंधपत्रे लिहून दिली आहेत, त्यांच्याही नावांची यादी संबंधित पोलीस ठाण्याकडे असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून ती यादी बीट मार्शलपासून तर गुन्हे शोधपथकापर्यत सर्वांना छायाचित्रांसह उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानुसार या गुन्हेगारांच्या वर्तणुकीवर पोलीस वॉच ठेवणार आहेत, असे पाण्डेय यांनी सांगितले.
--कोट---
सुधार योजनेतून अनावधानाने वाट चुकलेल्या गुन्हेगारांना सुधारण्याची संधी दिली जात आहे. त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातील. मात्र जे गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्ती सोडणार नाहीत अशांची कुठलीही गय केली जाणार नाही. त्यांच्या गुन्हेगारीचा पूर्वइतिहास तपासून तडीपार, झोपडपट्टी दादा कायदा (एमपीडीए), मोक्का यासारखी कारवाई करण्यात येईल.
-दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त