अखेरच्या दिवशी भक्तांची उसळली गर्दी : ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी भक्तांकडून साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:04 PM2017-09-04T22:04:14+5:302017-09-04T22:09:09+5:30
गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते.
नाशिक : आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि.४) अखेरच्या दिवशी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. सार्वजनिक मंडळांचे देखावे, आरासचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला.
गणेशोत्सवाचा समारोप मंगळवारी होणार असून पूर्वसंध्येला भक्तांचा जनसागर शहरात पहावयास मिळाला. भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याने रस्ते फुलले होते. कोटी कोटी रूपे तुझी..., आला आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेल्या वातावरणात भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेतले. बारा दिवसांपासून शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली पहावयास मिळत आहे; मात्र हे वातावरण उद्या संपुष्टात येणार आहे. विसर्जनाचा जल्लोष करत बाप्पाला भावपूर्ण निरोप देत ‘पुढच्या वर्षी लवकर या...,’ अशी साद भक्तांकडून घातली जाणार आहे.
संध्याकाळपासून बी. डी. भालेकर मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी कारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिकसह उपनगरीय परिसरात विविध सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त उभारलेले देखावे, आरास तसेच बाप्पांच्या एकापेक्षा एक देखण्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. भालेकर मैदानाकडे जाणाºया सर्व वाटांवर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शालिमार, सीबीएस-कान्हेरेवाडी, अण्णा भाऊ साठे चौक या परिसरात बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.