अखेरच्या दिवशी इच्छुकांची झुंबड
By admin | Published: February 7, 2017 01:16 AM2017-02-07T01:16:23+5:302017-02-07T01:16:37+5:30
शक्तिप्रदर्शन : मालेगावी गटासाठी ५६, गणासाठी १०५ अर्ज; सिन्नरमध्ये गटासाठी ५४, गणासाठी १११ अर्ज
नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आज, सोमवारी अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी समर्थकांसह मोठी गर्दी केल्याने तहसील कार्यालये गजबजून गेली होती. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस, रिपाइं यांच्यासह इतर पक्षांच्या इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. मालेगाव : आज येथील प्रांत कार्यालयात जिल्हा परिषदेच्या सात गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी नामांकन अर्ज दाखल केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण १६१ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अखेरच्या दिवशी ८५ इतके विक्रमी नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. या प्रक्रियेमुळे प्रांत कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मालेगाव तालुक्यातील सात गट व १४ गणांसाठी आज नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सकाळपासूनच येथील प्रांत कार्यालयात इच्छुकांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी नामांकन अर्ज स्वीकारले. जिल्हा परिषदेच्या गटासाठी आज अखेरच्या दिवशी ५६, तर गणासाठी २९ असे एकूण ८५ अर्ज दाखल झाले तर आज अखेर गटासाठी दाखल झालेल्या नामांकन अर्जांची संख्या ५६ झाली आहे, तर पंचायत समिती गणांसाठी दाखल झालेल्या इच्छुकांच्या अर्जांची संख्या १०५ इतकी विक्रमी झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण १६१ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी, ११ वाजेनंतर येथील प्रांत कार्यालयात दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. (लोकमत ब्युरो)
सिन्नरला समर्थकांची गर्दी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुकांची अक्षरश: झुंबड उडाली. यावेळी कार्यकर्त्यांची तहसील कार्यालयात जत्रा भरल्याचे चित्र होते.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या तालुकाध्यक्षांसह नेत्यांनी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे, तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, बाळासाहेब वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सीमा कोकाटे, बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, उपसभापती सोमनाथ भिसे, नगरसेवक रामभाऊ लोणारे, विजय काटे, शिवसेनेचे नगरसेवक विजय जाधव, शैलेश नाईक, पिराजी पवार, अवधूत आव्हाड, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, रासपाचे नीलेश जगताप, सुनील काटे यांच्यासह नेते व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठाण मांडल्याचे दिसून आले.
शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सहा गटातून ४३, तर गणांसाठी ७८ अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकूण दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या गटासाठी ५४, तर गणांसाठी १११ झाली आहे. उद्या, मंगळवारी (दि. ७) उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान, दुपारी अडीच वाजेनंतर सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण आहे हे स्पष्ट झाले.