उमेदवारी अर्जांसाठी आज शेवटचा दिवस
By admin | Published: February 6, 2017 12:45 AM2017-02-06T00:45:24+5:302017-02-06T00:45:42+5:30
इच्छुकांची लगीनघाई : शिवसेना, राष्ट्रवादीकडे सर्वाधिक गर्दी
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. ६) अखेरचा दिवस असून, शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १ ते ६ फेबु्रवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यात एक तारखेला प्रत्यक्षात एकाही पंचायत समिती गणाला व जिल्हा परिषद गटाला अर्ज दाखल करण्यात आला नाही. केवळ आॅनलाइनसाठी सात अर्ज दाखल करण्यात आले होते. शनिवारी व रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही इच्छुकांनी चक्क त्या त्या पक्षाचे एबी फॉर्मही उमेदवारी अर्जासोबत जोडले होते. कोणत्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत जाहीर केलेली नव्हती. कदाचित महापालिकेच्या उमेदवारी अर्जांचा गोंधळ लक्षात घेऊन अगोदरच त्या त्या पक्षांनी उमेदवारी निश्चित मानल्या गेलेल्या इच्छुकांकडेच एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी करण्यास सर्वाधिक गर्दी शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असल्याचे बोलले जाते. मालेगाव, निफाड, सिन्नर व नाशिक या तालुक्यांत शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असून, या चारही तालुक्यांत उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, बागलाण, कळवण या तालुक्यांत होण्याची चिन्हे आहेत.