नामांकनासाठी आज अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:44 AM2019-04-09T01:44:23+5:302019-04-09T01:44:54+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोमवारी (दि. ८) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केले.
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोमवारी (दि. ८) शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी अनुक्रमे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केले. त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार पवन पवार, बापू बर्डे या दोघांनीही शहरातून रॅली काढून अर्ज दाखल केले. दिवसभरात दोन्ही मतदारसंघातून बारा नामांकन दाखल करण्यात आले असून, मंगळवारी (दि.९) अंतिम दिवस आहे.
जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ एप्रिलपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारी दाखल करण्यास एक दिवसाचा कालावधी बाकी असताना सोमवारी सकाळी ११ वाजता शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांनी रॅलीने जाऊन दुपारी २ वाजेच्या दरम्यान आपले नामांकन दाखल केले. रॅलीत पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, राहुल आहेर यांच्यासह सेना-भाजपाचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. याचबरोबर वंचित आघाडीचे पवन पवार व दिंडोरीतून बापू बर्डे या दोघांनीही रॅली काढून आपले नामांकन दाखल केले. तसेच नाशिकमधून प्रकाश गिरीधर कनोजे, सुधीर श्रीधर देशमुख, बाजीराव (करण) पंढरीनाथ गायकर, देवीदास पिराजी सरकटे यांनी, तर दिंडोरीतून माकपाचे उमेदवार जिवा पांडू गावित यांनी पुन्हा अर्ज दाखल केला. याशिवाय, माकपाकडून हेमंत वाघेरे, बसपाचे अशोक त्र्यंबक जाधव व अपक्ष गाझी ऐतजाद खान यांनी देखील अर्ज दाखल केले. गेल्या चार दिवसांत नाशिक मतदारसंघातून दहा उमेदवारांनी बारा, तर दिंडोरीतून सात उमेदवारांचे १५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
उत्तर महाराष्टत युतीत कोणीही बंडखोर नाही, जे नाराज आहेत, त्यांच्याशी मुख्यंमत्री व प्रदेशाध्यक्ष संपर्क साधून असून, त्यांच्याशी बोलणी चालू आहे. त्यामुळे लवकरच नाराजांची समजूत काढण्यात येईल. - गिरीश महाजन, पालकमंत्री
भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा भाजपाचा नसून संपूर्ण देशाचा आहे. भाजपाशी काही प्रश्नांवर मतभेद होते, परंतु अनेक विषयांवर सहमती झाल्याने आता आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते