...अखेर गोदामाईचा श्वास होऊ लागला मोकळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 02:47 PM2020-06-08T14:47:02+5:302020-06-08T14:56:06+5:30
गोदावरीच्या काठाभोवती २००२ साली कॉँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच मागील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरदेखील टाळकुटेश्वर पुलापासून पुढे नदीच्या डाव्या-उजव्या तटाभोवती कॉँक्रीटच्या घाटांचा विस्तार थेट लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे गोदावरी-कपिला संगमापर्यंत करण्यात आला.
नाशिक :गोदावरी नदीपात्रात थेट रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत तटाभोवती करण्यात आलेल्या कॉँक्रीटीकरणामुळे गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत संपुष्टात आले आणि नदी परावलंबी होत गेली. गोदा कॉँक्रीटमुक्त करण्याचा लढा हा थेट न्यायालयापर्यंत पोहचला. परिणामी महापालिकेने आता स्मार्टसिटीअंतर्गत ‘प्रोजेक्ट गोदा’ अभियानाद्वारे नदीपात्रातील कॉँक्रीटचे घाट फोडण्यास सुरूवात केली आहे.
गोदावरी नदीचा कॉँक्रीटीकरणाद्वारे आवळलेला फास तत्काळ मोकळा करावा यासाठी गोदाप्रेमी सेवा समिती, आपलं पर्यावरण, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, नमामी गोदा अशा विविध संघटनांकडून गोदा कॉँक्रीटीकरणमुक्तीचा रेटा प्रशासनाकडे लावण्यात आला. अखेर मनपा प्रशासनाने सोमवारी (दि. ८) गोदा प्रोजेक्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात कामाला सुरूवातदेखील करण्यात आली.गोदावरीच्या काठाभोवती २००२ साली कॉँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच मागील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरदेखील टाळकुटेश्वर पुलापासून पुढे नदीच्या डाव्या-उजव्या तटाभोवती कॉँक्रीटच्या घाटांचा विस्तार थेट लक्ष्मीनारायण पुलापासून पुढे गोदावरी-कपिला संगमापर्यंत करण्यात आला. यावेळी विविध पर्यावरणप्रेमी संघटनांनी या कॉँक्रीट घाट विस्तारीकरणाला तीव्र विरोधदेखील दर्शविला होता. यामुळे नदीकाठावरील जैवविविधता संपुष्टात आलीच मात्र घाटांची स्वच्छता राखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडली. यामुळे नदीचे तट संवर्धन धोक्यात सापडले. यामुळे नदीप्रमींसह पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कॉँक्रीटीकरणमुक्तीचा ‘श्रीगणेशा’ झाल्यामुळे आता मात्र गोदावरी पुर्नर्जिवित करण्याच्यादृष्टीने महापालिकेने उशिरा का होईना ठोस पाऊल उचलले असे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले.
...या प्राचीन कुंडांना फुटणार पाझर
दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातील कॉँक्रीटीकरण तोडण्यास सुरूवात झाल्याने आता कॉँक्रीटीकरणाखाली दाबले गेलेले प्राचीन कुं ड मोकळे होणार आहे. पहिल्या टप्प्यात अनामिक, पाचकुं ड, दशाश्वमेघ, रामगया, पेशवे, खंडोबा कुं ड पुर्नजिवित होण्यास मदत होणार आहे. नदीपात्रात एकूण १७ प्राचीन कुंड आहेत.