..अखेर ‘त्या’ जमिनीवरील अतिक्र मण काढले
By admin | Published: September 30, 2016 11:54 PM2016-09-30T23:54:01+5:302016-09-30T23:54:42+5:30
ठेंगोडा : आदिवासींच्या आंदोलनाला यश
ठेंगोडा : येथील ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याबाबत लोकमतमध्ये (दि. १२ आॅगस्ट) वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी येथील आदिवासींनी सटाणा तहसील आवारात बिऱ्हाड आंदोलन व उपोषण केले होते. आदिवासींच्या आंदोलनाची चौथ्या दिवशी प्रशासनाने दखल घेत पंधरा दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्याने आदिवासींनी आपले आंदोलन सोडले होते. मात्र पंधरा दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही अतिक्रमण काढण्यात न आल्याने आदिवासींनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्णय घेताच प्रशासन खडबडून जागे झाले व सदरचे अतिक्र मण काढण्यात आले.
सदर अतिक्रमण काढण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत येथील आदिवासींनी आदिवासी दिनापासून बागलाण तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणार्थींमधील एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, प्रांत बागडे यांची बदली झाल्यानंतर अतिक्रमणाचा विषय पुन्हा मागे पडला होता. याबाबत आदिवासींनी पुन्हा सदर अतिक्रमण काढण्याबाबत हालचाली सुरू करताच प्रशासन खडबडून जागे झाले व सदर अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमणाविरुद्ध केलेल्या लढ्याला अखेर यश आल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच सुनीता ठाकरे यांनी दिली. (वार्ताहर)
प्रशासनाने आदिवासींच्या उपोषणाकडे सपसेल दुर्लक्ष केल्याने याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी नाशिक व तत्कालीन प्रांत संजय बागडे यांना आदिवासींच्या उपोषणाबाबत विचारणा करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रांताधिकारी संजय बागडे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन आदिवासी तसेच ठेंगोडा ग्रामपंचातीचे तत्कालीन सरपंच सुनीता ठाकरे, यशवंत पाटील व ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.