अखेरच्या सोमवारी ब्रह्मगिरीला सश्रद्ध प्रदक्षिणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 08:04 PM2018-09-03T20:04:26+5:302018-09-03T20:05:11+5:30
अखेरच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत भाविकांनी कुशावर्त तिर्थावरील पवित्र स्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेत सश्रद्ध अंत:करणाने ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा आनंद घेतला. या प्रदक्षिणेदरम्यान वरुणराजाकडून अधूनमधून जलाभिषेक सुरु होता.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा कुशावर्त परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजले होते. मंदीराच्या पुर्व गेटच्या सर्वच्या सर्व दर्शन बारी भाविकांच्या गर्दीने तुडूंब भरल्या होत्या. त्र्यंबकेश्वर मंदिरातून पालखी निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चौथ्या श्रावण सोमवारच्या निमित्ताने देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळातर्फे पंचमुखी मुखवटा आणण्यात आला. विश्वस्तांच्या हस्ते देवाला सोन्याची रुद्राक्ष माळ चढवून मुखवटा पालखीत विराजमान करण्यात आला. पालखी मिरवणूकीला पावणे तीन वाजता सुरुवात झाली. वाजंत्रीच्या गजरात पालखी कुशावर्तावर नेण्यात आली. तेथे पुजा, स्नान, आरती झाल्यानंतर पालखी लहान बाजारपेठेतून लक्ष्मीनारायण चौकापर्यंत व तेथुन मंदिरात आणण्यात आली. तेथे विश्वस्तांच्या उपस्थितीत भाविकांना सुवर्णाच्या रत्नजडीत मुकुटाचे दर्शन घडविण्यात आले. वर्षानुवर्षे ही परंपरा आजही चालू आहे. अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड तळ ठोकून होते. पेठ , त्र्यंबकचे उपविभागीय पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन होते. परिवहन महामंडळाचे बस स्थानक जव्हार फाटा मेळा बस स्थानकावर नेण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार, गटनेते समीर पाटणकर, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे, यात्रा सभापती विष्णु दोबाडे आदी आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत पालिकेकडून दिल्या जाणा-या सुविधा भाविकांना पुरवित होते.