...अखेरचा हा तुला दंडवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:20 AM2020-11-30T01:20:52+5:302020-11-30T01:22:09+5:30
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे भूमिपुत्र सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना नाशिककरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. रविवारी (दि.२९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास नाशिक अमरधाममध्ये सीआरपीएफच्या जवानांनी आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद नितीन यांना अंतिम मानवंदना दिली.
नाशिक : छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिकचे भूमिपुत्र सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांना नाशिककरांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. रविवारी (दि.२९) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास नाशिक अमरधाममध्ये सीआरपीएफच्या जवानांनी आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद नितीन यांना अंतिम मानवंदना दिली.
राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा सुरू झाली. सीआरपीएफच्या सजविलेल्या वाहनात नितीन यांची पार्थिव शवपेटीत ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून त्यांच्या पार्थिव असलेल्या वाहनावर पुष्पवृष्टी केली. राजीवनगर-इंदिरानगरमधील अंत्ययात्रेचा मार्ग रांगोळ्यांनी आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजविण्यात आला होता. चोख पोलीस बंदोबस्तात शहीद नितीन यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सव्वासात वाजेच्या सुमारास द्वारकामार्गे नाशिक अमरधाममध्ये पोहोचली. दरम्यान, अंत्ययात्रेत सहभागी युवकांनी भारत माता की जय..., वंदे मातरम..., जब तक सुरज-चांद रहेंगा, नितीन तेरा नाम रहेगा..., शहीद जवान जिंदाबाद, नक्षलवाद मुर्दाबाद..., शहीद जवान अमर रहें अशा घोेषणा दिल्या. अंत्ययात्रेच्या वाहनापुढे असलेल्या शहर वाहतूक पोलिसांच्या पेट्रोलिंग कारवरील ध्वनिक्षेपकामधून ‘ऐ मेरे वतन के लाेगो जरा याद करो कुर्बानी...’ हे गीत वाजविले जात होते. नितीन यांचे मोठे बंधू अमोल भालेराव यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.