अखेर भालेकर मैदानावरच गणेश मंडळांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:07 AM2018-09-04T01:07:18+5:302018-09-04T01:07:53+5:30
महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत.
नाशिक : महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांशी चर्चा करून परवानगीबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतरही आयुक्तांनी विचार करून ठरवू, असे सांगितल्याचे गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला आणि अखेरीस तो मिटला. मनपाच्या वतीने दरवर्षी भालेकर मैदानावर उत्सवासाठी परवानगी दिली जाते. परंतु यंदा ई-पार्किंगचे काम या मैदानावर सुरू असल्याने महापालिकेने परवानगी नाकारली होती. त्यामुळे आठ मंडळांना उत्सव कुठे साजरा करावा असा प्रश्न पडला होता. आयुक्तांनी ईदगाह मैदानाची पर्यायी जागा दिली असली तरी पोलीस खात्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नकार दिला होता. रविवारी (दि. २) पालकमंत्र्यांनी आयुक्त मुंढे यांना भालेकर मैदानावरच परवानगी द्या, असे आदेश दिले होते. परंतु आयुक्त मुंढे यांची भेट घेतली तेव्हा गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाºयांना त्यांनी विचार करू, असे सांगितल्याने पालकमंत्र्यांचे आदेश आयुक्त जुमानत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.