खामखेड्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात
By admin | Published: December 21, 2016 11:44 PM2016-12-21T23:44:24+5:302016-12-21T23:44:52+5:30
मजुरांना सुगीचे दिवस : शेतकऱ्यांची धावपळ सुरू
खामखेडा : परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र मध्यंतरीच्या पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे.उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. साधारणत: आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात केली जाते. ती नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होते. कारण पुढे उन्हाच्या कडाक्यामुळे विहिरीचे पाणी कमी-कमी होत जाते. परंतु यावर्षी मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे सुरुवातीच्या काळात टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने यावर्षी परिसरात कांद्याची लागवड उशिराने केली जात आहे. पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहजतेने मजूर वर्ग उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या रब्बीचा हंगाम असल्याने मजूर मिळणेही मुश्कील झाले आहे. मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वनवन करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे मजूर आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे ते बाहेरगावाहून मजूर आणतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे वाहन व्यवस्था नाही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात पैशाही खर्च होत आहे. रिक्षावाला बाहेरगावी जाऊन मजुरांना शेतात सोडतो व सायंकाळी ५ वाजता त्यांच्या गावी सोडतो. सध्या मजुरांना सुगीचे दिवस आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)