नाशिकमधून ‘द लास्ट व्हॉईसरॉय’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:59+5:302021-04-04T04:14:59+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अथर्व ड्रॅमॅटिक्स ॲकॅडमीच्या ‘द लास्ट व्हॉईसरॉय’ या नाटकाने नाशिक केंद्रातून बाजी ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अथर्व ड्रॅमॅटिक्स ॲकॅडमीच्या ‘द लास्ट व्हॉईसरॉय’ या नाटकाने नाशिक केंद्रातून बाजी मारली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा केली.
नाशिकला २०१९मध्ये प. सा. नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत १८ नाट्य प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यात या स्पर्धेत नाशिक केंद्रातून ओझरच्या एचईडब्ल्यूआरसी रंगशाखाच्या ‘प्रार्थनासुक्त’ने दुसरा क्रमांक पटकावला. नाशिक केंद्रातून अव्वल आलेल्या या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे, तर नाट्यसेवा थिएटर्सच्या ‘साधे आहे इतकेच’ या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक महेश डोकफोडे (द लास्ट व्हाईसरॉय), द्वितीय हेमंत सराफ (प्रार्थनासुक्त), अभिनयाचे रौप्यपदक अक्षय मुडावदकर आणि पूनम पाटील (द लास्ट व्हॉईसरॉय) यांना जाहीर झाले आहे. तर प्रकाश योजनेत प्रथम कृतार्थ कंसारा, द्वितीय आकाश पाठक, नेपथ्यमध्ये प्रथम मंगेश परमार, द्वितीय गणेश सोनावणे, तर रंगभुषात प्रथम माणिक कानडे, द्वितीय सुरेश भोईर यांना पारितोषिक जाहीर झाले आहे. तर अभिनयासाठीची गुणवत्ता प्रमाणपत्रे पूनम देशमुख, डॉ. प्राजक्ता भांबारे, मनीषा शिरसाट, भावना कुलकर्णी, पल्लवी ओढेकर, समाधान मुर्तडक, संदेश सावंत, विक्रम गवांदे, आदित्य भोम्बे, कुंतक गायधनी यांना जाहीर झाली आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाम अधटराव, संदीप देशपांडे, कीर्ती मानेगावकर यांनी काम पाहिले होते. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.