Lata Mangeshkar: स्वरगंगा दक्षिणगंगेत विलीन! भावपूर्ण वातावरणात लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:16 AM2022-02-10T11:16:32+5:302022-02-10T11:18:24+5:30
Lata Mangeshkar: लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले.
नाशिक : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन गुरुवारी ( दि. 10) सकाळी रामकुंडानजीकच्या अस्थीविलय कुंडात करण्यात आले. लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले.
लतादीदी यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 6 ) सायंकाळी दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मंगेशकर कुटुंबीय सकाळी विशेष विमानाने मुंबईहून ओझर येथे आणि तिथून कारने सव्वा दहा वाजता नाशिकला दाखल झाले. महापालिकेच्यावतीने रामकुंडावर शामियाना उभारून पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रामकुंडावर शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कलशपूजन करून मंत्रोच्चारासह सर्व विधी पार पाडून सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
लतादीदींचे भाचे आदिनाथ यांनीच सर्व विधी पार पाडले. यावेळी त्यांच्यासमवेत लतादीदींच्या भगिनी उषाताई मंगेशकर, बैजनाथ, राधा, कृष्णा आदिनाथ मंगेशकर. मयुरेश पै, मीनाताई यांचे पती योगेश खर्डीकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंगेशकर घराण्याचे उपाध्ये वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे आणि गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कलशपूजनासह सर्व धार्मिक विधी करण्यात आले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे महापालिका आयुक्त कैलास जाधव, मंगेशकर कुटुंबियांचे निकटवर्तीय प्रशांत जुन्नरे, माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अस्थी विसर्जनासाठी नाशिककर रसिकांनी रामकुंडाच्या दुतर्फा दर्शनासाठी गर्दी केली होती.