वाहतूक शाखेला सुचले उशिराने शहाणपण
By Admin | Updated: October 8, 2015 00:12 IST2015-10-08T00:11:52+5:302015-10-08T00:12:53+5:30
बालकाचा मृत्यू : अपघातानंतर कर्मचारी घटनास्थळी

वाहतूक शाखेला सुचले उशिराने शहाणपण
पंचवटी : बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सेवाकुंज जवळ बसने तिघा जणांना धडक दिल्याने अपघातात एका बालकाचा बळी गेला. त्यानंतर वाहतूक शाखेला उशिरा शहाणपण सुचले आणि चार ते पाच वाहतूक पोलिसांचे पथक दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले.
अपघातानंतर उशिराने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून चौकशी करणाऱ्या वाहनधारकांना दरडावून पुढे जाण्याबाबत सांगितले जात होते. अपघात झाल्यानंतर पोलिसांसह वाहतूक शाखेचे कर्मचारी उशिराने पोहोचल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचा समाचार घेतला. वाहतूक कोंडी सोडविणे, अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचणे यासाठी वाहतूक शाखेने पथक नियुक्त केले असले तरी, या पथकाची कामगिरी किती कुशल आहे हे बुधवारी झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर लक्षात येते. अपघातानंतर दाखल झालेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र नागरिकांच्या रोषापुढे त्यांनाही नमते घ्यावे लागले. (वार्ताहर)