निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेत सुप्त संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 12:25 AM2022-05-22T00:25:05+5:302022-05-22T00:30:04+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होताच सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्षाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीबाबत दुजाभाव करीत असल्याची पहिली तक्रार नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. आता राज्यातील सेनेचे सर्वच आमदार हा सूर आळवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन काही विकासकामांना स्थगिती देण्याची कारवाई करावी लागली. राष्ट्रवादीला ह्यजशास तसेह्ण उत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाचा निधी केवळ सेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात देऊ केला. त्याचसोबत सेनेच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या पत्राचा संदर्भ निधी वितरणाच्या आदेशात देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ आहेत. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा विषय अद्याप चर्चेला आलेला नसला तरी अंतर्गत मतभेद वाढीस लागले आहेत.
बेरीज वजाबाकी
मिलिंद कुलकर्णी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होताच सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुप्त संघर्षाची धग जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात निधीबाबत दुजाभाव करीत असल्याची पहिली तक्रार नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. आता राज्यातील सेनेचे सर्वच आमदार हा सूर आळवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन काही विकासकामांना स्थगिती देण्याची कारवाई करावी लागली. राष्ट्रवादीला ह्यजशास तसेह्ण उत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाचा निधी केवळ सेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात देऊ केला. त्याचसोबत सेनेच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या पत्राचा संदर्भ निधी वितरणाच्या आदेशात देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ आहेत. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा विषय अद्याप चर्चेला आलेला नसला तरी अंतर्गत मतभेद वाढीस लागले आहेत.
उपकेंद्र भूमिपूजनाला वादाचा फटका
पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तीनदा मुहूर्त काढूनही झालेले नाही. गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री उदय सामंत हे मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी नाशिकला आले, त्यावेळी भूमिपूजन करण्याचे विद्यापीठाने निश्चित केले. परंतु, पालकमंत्री छगन भुजबळ उपलब्ध नसल्याने भूमिपूजन पुन्हा पुढे ढकलले गेले. शिवनई येथील जागेत हे उपकेंद्र होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद केली गेली. निविदा काढण्यात आली. गेल्या दौऱ्यात मंत्री सामंत यांनी आढावा घेतला. तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. भुजबळ यांनीही आढावा बैठकीत याविषयीची माहिती घेतली. मात्र, दोन पक्षांमधील दिग्गज मंत्र्यांमधील सुप्त संघर्षातून हे भूमिपूजन रखडले आहे. याचा फटका शैक्षणिक संस्थांना बसत आहे. सध्याच्या उपकेंद्राविषयी संस्थाचालक, प्राचार्य यांच्यात नाराजीचा सूर आहे. नवीन इमारत, मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास पुण्याचे हेलपाटे वाचतील.
ठाकरेंच्या दौऱ्यात काँग्रेसचे आमदार
पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांत नाशिकच्या केलेल्या दोन दौऱ्यात आदिवासी तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तेथील पाणीप्रश्न, ब्रह्मगिरी उत्खनन, उंटवाडीतील हेरिटेज वटवृक्ष या विषयात वैयक्तिक लक्ष घातले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असताना पाणीयोजना, रस्ते कामांविषयी ठाकरे हे भेटीदरम्यान आदेश देत आहेत. अलीकडच्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वर दौऱ्यात त्यांनी शिदवड येथील नळपाणीपुरवठा योजना वर्षभरात पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महादरवाजा मेट येथील नळपाणी योजनेचे त्यांनी उद्घाटन केले. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना सोबत घेत असताना त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दूर ठेवल्याचे ठळकपणे जाणवले. पर्यावरण व पर्यटन या खात्याशी संबंधित निधीवरूनही राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांच्या मंत्रालयाचे सचिव तसेच शिवसेनेचे नेते पर्यटनस्थ विकासविषयक प्रस्ताव मागवत आहेत.
प्रभागरचनेवरून धुसफूस कायम
नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धुसफूस कायम आहे. प्रभागरचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने त्यात आता बदल होणार नाही; पण शिवसेनेने पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलून सोयीस्कररीत्या प्रभागरचना केल्याचा उघड आरोप राष्ट्रवादीचे पदाधिकारी गजानन शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समक्ष पक्षाच्या बैठकीत केला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाजपसोबत मिलीभगत असल्याचाही आरोप शेलार यांनी केला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेनेविषयी काय भावना आहे, हे या बैठकीत दिसून आले. शिवसेनेकडून दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेनेशी आघाडी केली तर राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट होईल, असे अपूर्व हिरे यांनी बैठकीत म्हटले होते. दोन्ही पक्षांचा मार्ग वेगळा राहतो की, राऊत-भुजबळ यात तडजोड घडवून आणतात काय?
खासदारकीवर राष्ट्रवादीचा दावा?
सिन्नर तालुक्यातील वावी येथील एका जाहीर कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर आवाहन करून महाविकास आघाडीतील ताणतणावात आणखी भर घातली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे आहे. पण, महाविकास आघाडीत आता तो कोणाकडे जातो, हे अद्याप निश्चित झालेले नाही. हेमंत गोडसे हे सलग दोनदा निवडून आल्याने शिवसेना या जागेवर विद्यमान खासदार या सूत्राने नैसर्गिक दावा ठोकेल. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहजासहजी ही जागा सोडणार नाही, असे म्हटले जाते, त्याचा प्रत्यय भगीरथ शिंदे यांच्या विधानावरून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नियोजनबद्ध व सूत्रबद्ध रीतीने काम करीत आहे. वातावरण निर्मिती करण्यात हा पक्ष माहीर आहे. कोकाटे यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. कन्या सीमंतिनी यांना आमदार बनविण्याची त्यांची इच्छा आहेच.
सुप्रिया सुळे यांची चाचपणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकसाठी एक संपूर्ण दिवस दिला. त्यांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षीय कोणताही कार्यक्रम न घेता त्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील धुरीणांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशस्विनी महिला अभियान या माध्यमातून त्यांनी महिला, साहित्यिक, सनदी लेखापाल, उद्योजक या घटकांशी विचारविनिमय केला. पत्रकार परिषदेत त्यांनी दौऱ्याचा उद्देश सांगितला, तरीही समाजात राज्य व केंद्र सरकारविषयी काय भावना आहेत, याचा कानोसा त्यांनी घेतला. महागाई, जातीधर्मावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याविषयी समाजात नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्टचा विषय गाजत असताना दुसऱ्या दिवशी त्या नाशकात होत्या. एखाद्याच्या मृत्यूविषयी इच्छा व्यक्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत या प्रकाराचा निषेध करणाऱ्या ठाकरे बंधू, फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी हा दौरा केला.