आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूरला विभागीय उपकेंद्र ; कुलगुरु डॉ. म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:59 PM2020-06-11T19:59:47+5:302020-06-11T20:05:38+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त केली असून आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लातूर येथे विभागीय उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त येथे केली.
आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध प्रमाणपत्र, अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट करीत कुलगुरु डॉ. म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तसेच कार्यालयीन कामासाठीच्या अडचणी विनाविलंब सुटाव्यात तसेच कामकाज अधिक सुलभ व्हावे, यासाठी विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथे उपकेंद्र सुरू करण्याची भूमिका मांडली. तसेच आरोग्य क्षेत्रात काम करताना मोठ्या प्रमाणावर कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात प्रतिकुलपती देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र अभ्यासक्रम लवकरच सुरू होतील, असेही कुलगुरु डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
रोजगाराच्या नव्या संधी...
प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे आरोग्य क्षेत्रात तांत्रिक व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन आॅपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, रेडिओ टेक्नॉलॉजी, ईपीडेमिक मॅनेजमेंट, डायलेसीस, ईसीजी, कॅथलॅब याबरोबरच पंचकर्म, आयुर्वेद नर्सिंग, डेंटल मेकॅनिक याचेही प्रमाणपत्र अभ्यासक्रम एक ते दोन वर्षे कालावधीचे राहतील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.