हास्य, विनोदी कवितांनी उडाले हास्याचे फवारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 01:42 AM2022-04-18T01:42:39+5:302022-04-18T01:44:30+5:30

नाशिक : मानवी जीवनात कवितेचे स्थान खूप मोठे आहे. कविता व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवते, असे सांगताना हास्यकवी अशोक नायगावकर यांनी ...

Laughter, humorous poems, fountains of laughter! | हास्य, विनोदी कवितांनी उडाले हास्याचे फवारे!

हास्य, विनोदी कवितांनी उडाले हास्याचे फवारे!

googlenewsNext
ठळक मुद्देअशोक नायगावकर यांचा प्रतिसाद गवान महावीर जन्मकल्याणक व्याख्यानमालेची सांगता

नाशिक : मानवी जीवनात कवितेचे स्थान खूप मोठे आहे. कविता व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवते, असे सांगताना हास्यकवी अशोक नायगावकर यांनी समाजात, घरोघरी सहजपणे घडणाऱ्या घटनांवर आपल्या खास विनोदी शैलीत प्रकाश टाकला, तसेच विविध घटना, किस्से, कविता सादर करत उपस्थित श्रोत्यांना खळखळून हसविले. रसिकांनीही वाह वाह करत त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त श्री जैनसेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेची रविवारी (दि.१७) सांगता झाली. यावेळी ‘मिश्कील आणि कविता’ या विषयावर कवी नायगावकर यांनी अखेरचे पुष्प गुंफले.

विश्वास ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

‘उजाडतंय उजाडतंय आत्ता आत्ता कॉरंन्टाइनमधून बाहेर पडतेय पृथ्वी, काही दिवस बंद होता तिचा मॉर्निंग वॉक’ या कवितेने कवी नायगावकर यांनी आपल्या मनोगतास सुरुवात केली. यानंतर सादर केलेल्या ‘माय’ कवितेला उपस्थितांची वाहवा मिळवली. याप्रसंगी नीलिमा पवार यांनी व्याख्यानमालेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकत आठवणी सांगितल्या, तसेच अशा प्रकारच्या कार्याची समाजाला गरज असल्याचे सांगितले. व्याख्यानमाला शंभर वर्षांपर्यंत सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माजी महापौर यतीन वाघ यांनीही व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. विश्वास ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून संवाद साधला.

कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता संयोजक पंचवीस वर्षांपासून व्याख्यानमालेचा उपक्रम राबवत आहेत. अनेक दिग्गज मंडळींनी या व्यासपीठावर येऊन आपले अनमोल विचार समाजासमोर ठेवले आहेत. समाज प्रबोधनाकरिता असे उपक्रम अविरत सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

गौतम सुराणा यांनी प्रस्तावनेतून व्याख्यानमालेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन ॲड. पल्लवी कटारिया यांनी मानले. रविवारच्या चौथ्या पुष्पाने भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेची सांगता झाली.

-------

फोटो : १७पीएचएपी८१ : व्याख्यानमालेत मनोगत व्यक्त करताना अशोक नायगावकर. समवेत गौतम सुराणा, विश्वास ठाकूर, यतीन वाघ, गिरीश पालवे, नीलिमा पवार आदी.

Web Title: Laughter, humorous poems, fountains of laughter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.