डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:22 AM2021-05-05T04:22:52+5:302021-05-05T04:22:52+5:30

नाशिक : सामाजिकता आहे म्हणून शाहीर शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते. मनोरंजनापेक्षा प्रबोधनालाच हत्यार बनविण्याचे काम शाहिरांनी केले, ...

Launch of Digital Spring Lecture Series | डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ

डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा शुभारंभ

googlenewsNext

नाशिक : सामाजिकता आहे म्हणून शाहीर शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते. मनोरंजनापेक्षा प्रबोधनालाच हत्यार बनविण्याचे काम शाहिरांनी केले, असे प्रतिपादन लोककलेचे अभ्यासक रमेश कदम यांनी केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृतिप्रीत्यर्थ दुसरे पुष्प कदम यांनी गुंफले, यावेळी ते बोलत होते. शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेचे उद‌्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दुसऱ्या वर्षी व्याख्यानमाला डिजिटल पद्धतीने घेण्यात आली. विचारांचे प्रभुत्व माणसांच्या जीवनावर पडते, विचार बदलले की आयुष्य बदलते, वसंत व्याख्यानमालेने हाच प्रभाव कायम ठेवला, असे मनोगत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या मालेचे दुसरे पुष्प रमेश कदम यांनी ‘शाहिरी क्षेत्राचे सामाजिक योगदान’ या विषयावर गुंफले.

यादरम्यान कदम यांनी शाहीर अमर फंदी, अमर शेख, अण्णा भाऊ साठे, शाहीर साबळे, वामनदादा कर्डक, गजाभाऊ बेणी यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रारंभी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले. याप्रसंगी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, उपाध्यक्ष विजय हाके, अविनाश वाळुंजे, विजय काकड, सुनील गायकवाड आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंतवणूक सल्लागार पंकज नेरे यांनी गुंफले, ‘अर्थ नियोजनाचे जीवनातील महत्त्व’ या विषयावर बोलताना अर्थ असेल तरच जीवनाला महत्त्व असल्याचे सांगितले. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो, आणि उरलेला पैसा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवला जातो. बऱ्याचदा पैसे कमविण्यास महत्त्व दिले जाते; पण पैशांच्या व्यवस्थापनाकडे काणाडोळा केला जातो, असे करणे अयोग्य असल्याचे नेरे यांनी सांगितले. साधनसंपत्तीचे विवेकाने सुनियोजन करून प्रत्येकाने आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्याची गरजही पंकज नेरे यांनी व्यक्त केली तर सचिन उषा विलास जोशी यांनी कोरोनाकाळात भावनिक व्यवस्थापनदेखील आवश्यक असल्याने मेडिटेशन करावे, असे सांगितले. महामारीच्या काळात जनतेपर्यंत चांगले विचार पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

इन्फो

शाहिरी कला जपण्याची गरज

शाहिरी पेशा गौरवाचा, प्रतिष्ठेचा आहे, सीमेवर जी भावना सैनिकांची असते तीच भावना शाहीर प्रबोधनातून मांडतात. सामाजिकता आहे म्हणून ते शाहिरी करतात, नाहीतर शाहीर घडले नसते, असा मानस रमेश कदम यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक क्षेत्रावर आक्रमण होत असून, शाहिरी ही कला जपण्याची गरज व्यक्त करून कदम यांनी लोकशाहीर निर्माण करण्यासाठी एक वेगळे व्यासपीठ निर्माण करावे लागेल, असेही ते म्हणाले.

Web Title: Launch of Digital Spring Lecture Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.