नायगाव उपबाजारात धान्यभुसार शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 05:00 PM2018-10-11T17:00:01+5:302018-10-11T17:07:08+5:30
सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नायगाव उपबाजार आवारात सोयाबीन, मका व धान्यभुसार शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. नायगाव येथील उपबाजारात बुधवारपासून सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते सोयाबीन, मका, धान्य भुसारसह शेतमालाच्या लिलावास प्रारंभ करण्यात आला.
नायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका व धान्य भुसार शेतमाल विक्रीसाठी नायगाव उपबाजारात आणावा असे आवाहन सभापती तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे यांनी केले. तसेच व्यापा-यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन, मका या शेतमालाची रक्कम शेतकºयांना २४ तासाच्या आत रोख स्वरुपात अदा करावी अशा सूचना बाजार समितीच्यावतीने करण्यात आल्या. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी ३३०० रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करण्यात आली. संतोष भराडीया, बबला ठक्कर, संजय सानप, संजय आव्हाड, एकनाथ सानप, विलास काकड, इम्तीयाज पटेल, राजु मंडलीक या व्यापा-यांनी लिलावात भाग घेतला. याप्रसंगी समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे, सोपान उगले, सचिव विजय विखे, उपसचिव ए. सी. शिंदे, व्यवस्थापक एस. डी. चव्हाण, यांनी लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडली. भविष्यात भावांतर योजना शासनाने लागू केल्यास त्याचा तफावतीचा फरक हा त्याच शेतक-यांना घेता येईल ज्या शेतक-याने बाजार समितीच्या आवारात आपला धान्यभुसार व शेतमाल लिलावाने विक्री केलेला आहे. त्यासाठी शेतक-यांनी बाजार समितीच्या आवारातील केंद्रावरच मालाची विक्री करावी असे आवाहन सचिव विखे यांनी केले.