घरपोहोच धान्य योजनेचा शुभारंभ
By admin | Published: October 29, 2014 10:42 PM2014-10-29T22:42:06+5:302014-10-29T22:42:20+5:30
घरपोहोच धान्य योजनेचा शुभारंभ
आहुर्ली : म्हसुर्ली येथे अन्नसुरक्षा योजनेला घर पोहोच धान्य वितरण सेवेची जोड देण्यात आली असून, या योजनेअंतर्गत धान्य वितरणाचा शुभारंभ नुकताच झाला आहे. विशेष म्हणजे अन्न सुरक्षा योजनेशी निगडित राबवली जाणारी इगतपुरी तालुक्यातील घर पोहोच धान्य वितरणाची ही पहिलीच सेवा आहे.
रेशन दुकानदाराचा मुजोरपणा, काळ्या बाजारात चढ्यादराने विकले जाणारे धान्य व निर्माण करण्यात आलेली कृत्रिम धान्यटंचाई यावर मात करण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने घरपोहोच धान्य वितरण सेवा यशस्वी ठरली आहे. अन्नसुरक्षा योजनच्या रुपाने त्यात आणखी भर टाकून शासनाने नव्या प्रभावी योजनेचा प्रारंभ केला होता. मात्र या योजनेमुळे मधल्या काही काळात घर पोहोच धान्यवितरण सेवेला ब्रेक लागला होता. म्हसुर्ली येथील युवक विजय तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबद तहसीलदार व पुरवठा विभागाच्या आधिकाऱ्यांशी चर्चा करून या दोन्ही योजनांचा संगम करून गोरगरिबांना थेट या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती.
प्रशासनानेही यास हिरवाकंदिल दाखवत ही योजना पुन्हा नव्याने सुरू करत म्हसुर्ली येथून तिचा शुभारंभ केला आहे. या योजनेतंर्गत तीन महिने मिळून प्रत्येक लाभार्थ्यांस किमान ६० किलो गहु व ३५किलो तांदुळ मिळणार आहे. योजना राबवणेसाठी तहसीलदार महेंद्र पवार, पुरवठा विभागाचे निकम व बांडे यांचे सहकार्य लाभले आहे.
या योजनेचा शुभारंभ म्हसुर्लीचे सरपंच - उपसरपंच, पो.पा.शांताराम तांबे, माजी सरपंच सौ.इंदुबाई शिवाजी पोटकुले, विजय तांबे, शरद तांबे , रेशन दुकानदार गुलाब वाजे , अंकुश क्षीरसागर आदिंच्या उपस्थितीत झाला .(वार्ताहर)