करंजाळी येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:14 PM2020-11-20T21:14:57+5:302020-11-21T00:44:07+5:30
पेठ : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधादेखील लवकरच उपलब्ध ...
पेठ : आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदीचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांना या केंद्राजवळ लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधादेखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
पेठ तालुक्यातील करंजाळी येथे आधारभूत हमीभाव योजनेंतर्गत धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी झिरवाळ बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक तथा आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड, उपव्यवस्थापक रोहित बनसोडे, तहसीलदार संदीप भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झिरवाळ म्हणाले, महामंडळ आधारभूत हमीभावापेक्षा कमी दराने धान खरेदी करणार नाही तसेच शेतकऱ्यांनीही इतर व्यापाऱ्यांना विक्री करताना हमीभावपेक्षा कमी दराने विकू नये; म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना आदिवासी विकास महामंडळाला पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भात गिरण्यांचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत आहे. त्यासाठी सहकार विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पेठ तालुक्यातील सहकारी सोसायट्या तसेच या संबंधित असलेल्या संस्था यांसोबत चर्चा करून वरिष्ठ स्तरावर निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आमदार सुनील भुसारा यांनी धान खरेदी केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आधारभूत हमीभाव केंद्रांतर्गत धान खरेदीमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी रोखीने होणारे व्यवहार आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात होत आहेत. सध्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण २५ केंद्रे स्थापन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
--------------
खरेदी केंद्रातील हमीभाव
करंजाळी येथील आधारभूत केंद्रामध्ये असलेल्या धानाचा प्रतिक्विंटल हमीभाव यामध्ये अ दर्जाचा भाताचा दर १८८८ रुपये, साधारण भात १८६८ रुपये, हायब्रीड ज्वारी २६२० रुपये, मालदांडी ज्वारी २६४० रुपये, मका १८५० रुपये, बाजरी २१५० रुपये तर नागलीचा दर ३२९५ रुपये असल्याचेही प्रादेशिक व्यवस्थापक जयराम राठोड यांनी सांगितले.