पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:09 PM2018-01-28T23:09:03+5:302018-01-29T00:10:46+5:30
काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
सिन्नर : काही देशांमध्ये अद्याप स्वच्छतेअभावी पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले नाही. भारतात २०११ नंतर एकही पोलिओची केस आढळली नाही. भारत देशाला सशक्त राष्टÑ घडविण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करावी. त्यासाठी आरोग्य विभागास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वावी येथे राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाघचौरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, प्रभारी सरपंच विजय काटे, मावळत्या सरपंच मंगल वेलजाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सांगळे यांच्या हस्ते ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना सांगळे म्हणाल्या की, महिलांसोबत संवाद साधता यावा यासाठी वावी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शून्य ते पाच वर्षांच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे आवाहन सांगळे यांनी केले. यावेळी विठ्ठलराव राजेभोसले, ईलाहीबक्ष शेख, प्रशांत कर्पे, सतीश भुतडा, किरण घेगडमल, दीपक वेलजाळी, आशिष माळवे, विलास पठाडे, कारभारी वेलजाळी, बेबी आनप, नंदा गावडे, प्रतिभा राजेभोसले, दत्तात्रय वेलजाळी, विलास आनप, सुभाष घेगडमल, रवींद्र वेलजाळी, संदीप राजेभोसले, तिष्णा बुकाणे, सुरेखा लोहट, राजू जोरी, राजेंद्र गोराणे, नवनाथ नवले, एस. वाय. कोकाटे, जी. बी. पाटील, आर. के. काळे, संजना पाटोळे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
वावीच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना
सिन्नर : शिर्डी महामार्गावरील वावी गाव मध्यवर्ती व महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. वावीचा परिसर मोठा असल्याने व महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने वावी येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा वावी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर सांगळे यांनी वावी येथे ग्रामीण रुग्णालय गरजेचे असल्याचे मान्य करीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, डॉ. मोहन बच्छाव यांना पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव मंजूर करून तातडीने जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमदार राजाभाऊ वाजे व आपण आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही सांगळे यांनी वावी ग्रामस्थांना दिले.
जिल्ह्यात ३१५४ बूथ
जिल्ह्यात २८ जानेवारी हा दिवस पोलिओ रविवार म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी जिल्हा आरोग्य विभागाकडून चार लाख १४ हजार ९६ लाभार्थी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी आठ हजार १०९ आरोग्य कर्मचारी, ६३४ पर्यवेक्षक कार्यरत होते. जिल्ह्यात ३१५४ बूथवर शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येत होते. त्यानंतर ३०, ३१ जानेवारी व १ फेबु्रवारी रोजी घरभेटी देऊन बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. रविवारी जिल्ह्यात वाड्या-तांड्यांवर बालकांना डोस पाजण्यासाठी १३७ मोबाइल पथक होते.