इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 09:10 PM2021-01-19T21:10:47+5:302021-01-21T01:19:19+5:30
नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने इगतपुरी आगारात सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ आगार व्यवस्थापक संदीप पाटील व वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात आगारातील बसचे पूजन करण्यात येऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे संजय बाठीया यांच्या हस्ते सुरक्षा सप्ताह मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी वाहतूक निरीक्षक कैलास नाठे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वाहतुकीचे नियम पाळा, मादक पदार्थाचे सेवन करू नका, तसेच इतर वाहनांचा व प्रवाशांचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पादचारी, रस्त्याची परिस्थिती याचा विचार करून वाहने चालवावीत. बसमध्ये एकाच वेळी अनेक प्रवासी असतात. हे लक्षात घेऊन दक्षतापूर्वक वाहने चालविली पाहिजे. असा मोलाचा सल्ला यावेळी वाहतूक निरीक्षक नाठे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिला, तर इगतपुरी आगारात २०२१ मध्ये एकही अपघात होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पाटील यांनी कले. याप्रसंगी सहायक वाहतूक निरीक्षक कैलास गरुड, विलास बिन्नर, कामगार नेते अर्जुन खातळे, वाहतूक नियंत्रक राकेश सांगळे, वाहन परीक्षक प्रवीण चौधरी, शिवनाथ खडके, हेमंत गायकवाड, चिमा पारधी, आकाश काळे, वायाळ, सांगळे, आव्हाड, पंकज दाणी आदींसह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश काळे यांनी केले.