जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:35 AM2019-07-02T00:35:16+5:302019-07-02T00:35:53+5:30
राज्याच्या वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात वनविभागाकडून एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे.
नाशिक : राज्याच्या वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात वनविभागाकडून एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. या जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले गावात करण्यात आला. येथील वनजमिनीवर १६ हजार ५०० रोपे लावण्यात येणार असून, सोमवारी (दि.१) येथे गावकरी, शालेय विद्यार्थ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले.
वनजमिनी व वनेतर जमिनींचे क्षेत्र वृक्षाच्छदनाखाली आणण्यासाठी २०१६ सालापासून सरकारने ५० कोटी रोपे लागवडीचे अभियान अर्थात ‘वनमहोत्सव’ सुरू केला आहे. या अभियानाचे हे अखेरचे वर्ष असून, यावर्षी ३३ कोटी रोपे लागवडीचे ‘टार्गेट’ वन मंत्रालयाकडून संपूर्ण राज्यभरासाठी निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर असा कालावधी या अभियानाचा ठरविण्यात आला आहे. पावसाळ्यात वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने जनसामन्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि रोपे लागवडीची चळवळ व्यापक बनावी, हा यामागील उद्देश आहे. वनविभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यात एकूण एक कोटी २७ लाख रोपांची लागवड केली जाणार आहे. नाशिक पश्चि वनविभाग २६ लाख, तर पूर्व वनविभाग २८ लाख रोपे त्यांच्या वनपरिक्षेत्रांमधील वनजमिनींवर लावणार आहेत. जिल्हास्तरीय वनमहोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी रोहिले येथे प्रमुख पाहूणे म्हणून विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनअधिकारी राजन गायकवाड, एस. एम. निरगुडे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींना रोपांचे वाटप
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मिळून सुमारे ४४ लाख २४ हजार रोपे लावायची आहेत. त्यांना प्रत्येकी तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून प्रत्येक ग्रामपंचायतीला रोपे मोफत पुरविली जाणार असून, रोपांचे वाटप सुरू झाले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींकडून सोमवारी रोपांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला.