ट्रॉलीचे लोकार्पण : स्मार्ट सिटी कामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:32 AM2018-06-27T00:32:48+5:302018-06-27T00:34:22+5:30
नाशिक : चार वेळेस मुुहूर्त हुकलेल्या सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युअर ट्रॉलीचे लोकार्पण जिल्ह्यात राजकारणाचा मुद्दा बनू पाहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर नाशिकला येण्याचे निश्चित केले असून, त्यांच्या उपस्थितीत पुढच्या आठवड्यात ट्रॉलीचे लोकार्पण करण्याबरोबरच नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात येणाºया स्मार्ट सिटीच्या कामांचा शुभारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून १ किंवा २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांकडून येणे निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय तयारी व सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युअर ट्रॉलीच्या लोकार्पणाबाबत माहितीही मागविण्यात आली आहे. सदर ट्रॉलीचे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असून, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारवेळा लोकार्पणाचा मुहूर्त मुक्रर केला; परंतु काही ना काही कारणाने त्यांचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला. त्यामुळे चैत्रोत्सवातदेखील भाविकांना ट्रॉलीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे पाहून सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने या ट्रॉलीचे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत करून तो शासनाकडे पाठविला, तर शिवसेनेनेदेखील आठ दिवसांत ट्रॉलीचे लोकार्पण न झाल्यास शिवसेना स्टाइल ट्रॉली लोकांसाठी खुली करण्याचा इशारा दिला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदा नाशिक दौºयावर आलेल्या छगन भुजबळ यांनी सप्तशृंगी देवीच्या दर्शनानिमित्त फ्यूनिक्युअर ट्रॉलीत बसून मंदिर गाठल्यामुळे ट्रॉलीचे लोकार्पण राजकीय मुद्दा बनत चालत असल्याचे पाहून अखेर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिक दौºयावर येण्याचे निश्चित केले आहे. ४ जुलैपासून विधिमंडळाचे नागपूर येथे अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यात पुन्हा ते शक्य होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांचे येणे शक्य आहे, मात्र अधिकृत दौरा आलेला नाही. त्यामुळे ते थेट सप्तशृंगगडावर हेलिकॉप्टरने येतात की ओझरला विमानाने येऊन रस्तामार्गे गड गाठतात याबाबत संदिग्धता आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे गडावर हेलिकॉप्टर नेणे खराब हवामानामुळे शक्य नाही तर गडाच्या पायथ्याशी चिखलामुळे हेलिपॅड तयार करण्यातही अडचणी उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.