खासगी क्लास नियमनासाठी होणार कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:14 AM2017-09-10T01:14:14+5:302017-09-10T01:14:24+5:30
राज्यातील खासगी कोचिंग क्लासेससाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नियम तयार केले जाणार आहेत
नाशिक : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेससाठी राज्य शासन लवकरच कायदा करणार आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक नियम तयार केले जाणार आहेत
खासगी कोचिंग क्लासेस आता समांतर व्यवस्था म्हणून जणू मान्य झाली आहे. काही व्यावसायिक शिक्षणक्रम किंवा सामायिक प्रवेश परीक्षेसाठी, तर खासगी क्लासेस हाच एक पर्याय ठरतो शिक्षण व्यवस्थेचा एक अपरिहार्य भाग ठरलेल्या या क्लासेसला आता सिस्टीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुमारे १८ वर्षांपूर्वी राज्य सरकारने या कायद्याची पायाभरणी केली होती. आता त्याला अंतिम स्वरूप देऊन विधेयकात रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत केली असून, त्यात शासकीय अधिकाºयांबरोबर खासगी कोचिंग क्लासेसचालकांच्या चार प्रतिनिधींचा समावेश केला आहे. राज्यात सुमारे २५ हजार खासगी क्लासेस असून, त्यांच्यासाठी हा कायदा करताना विद्यार्थी केंद्र बिंदू मानून काही सुविधांची सक्ती करण्यात येणार आहे. विशेषत: प्रत्येक खासगी क्लासला विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एका विद्यार्थ्याला बसण्यासाठी किमान ३ बाय ३ इतकी जागा तसेच विद्यार्थ्यांच्या दुचाकीच्या पार्किंगसाठी जागा असे अनेक नियम करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. नव्या कायद्यात खासगी क्लासेससाठी विद्यार्थी संख्या ठरविणे तसेच शुल्क ठरविणे आणि रहिवासी क्षेत्राऐवजी व्यावसायिक क्षेत्रातच व्यवसाय सुरू करण्याच्या काही नियमांची चर्चा असून, त्याला मात्र खासगी कोचिंग क्लासचालकांचा विरोध आहे. नाशिकमध्ये या संघटनेचे साडेपाचशे सदस्य आहेत.