लॉन्स, मंगल कार्यालयात शुभमंगल करा, पण.... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:48+5:302021-04-08T04:15:48+5:30
पोलीस आयुक्तालयाकडून नुकताच सोमवारी (दि.५) कलम-१४४(१),(३) अन्वये आदेश पारित केला. या आदेशामध्ये ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत सर्व प्रकारचे कोरोना प्रतिबंधक ...
पोलीस आयुक्तालयाकडून नुकताच सोमवारी (दि.५) कलम-१४४(१),(३) अन्वये आदेश पारित केला. या आदेशामध्ये ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत सर्व प्रकारचे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पूर्व परवानगीने लग्नसोहळे लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये आयोजित करता येणार आहे; मात्र कुठल्याही प्रकारे नियमांचा जर कोठे भंग होत असल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाकडून संबंधित लग्न आयोजकांसह लॉन्स, मंगल कार्यालय चालकांवरसुद्धा कारवाई होऊ शकते असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एप्रिल, मे, जून या महिन्यांमध्ये ज्यांच्या घरात लग्न ठरलेले होते ते वधू - वर पिता व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. परंतु या नवीन आदेशातील तरतुदीनुसार संबंधितांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्चमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिकमध्ये लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ करण्यावर निर्बंध घातले होते. कुठल्याही प्रकारे सामूहिक स्वरुपात लग्नसोहळे पार पडणार नाही, असे आदेश यापूर्वी प्रशासनाने दिले होते.
--इन्फो--
मंगल कार्यालय, लॉन्स संघटनेची बैठक
पोलीस प्रशासनाचे आदेश प्राप्त होताच मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशन तसेच विवाह विषयक सेवा देणाऱ्या सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी तातडीने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक घेण्यात आली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करणे सर्वांवर बंधनकारक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. नियमाप्रमाणे मर्यादित लोकांच्या उपस्थित विवाह सोहळ्याचे बुकिंग करून घेणे व पूर्वी झालेल्या बुकिंगचे विवाह ठरलेल्या तारखांना शासकीय नियमानुसार संपन्न करण्याचे ठरविण्यात आले.
नाशिकमधील सर्व मंगल कार्यालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व निर्बंध अनुसार विवाह सोहळे पार पाडावेत, यात कुठल्याही प्रकारचा कसूर झाल्यास तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंगल कार्यालय अथवा लॉन्सचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात येईल, असे नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीला लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चोपडा, वेडिंग फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड, उपाध्यक्ष उत्तमराव गाढवे, केशवराव डिंगोरे, मंगल कार्यालय असोसिएशनचे सेक्रेटरी शंकरराव पिंगळे आदी उपस्थित होते.
---इन्फो--
...अशी घ्यावी लागणार खबरदारी
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. यामुळे प्रत्येक लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल चालकांना विवाहसोहळे पार पाडताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम अगदी काटेकोरपणे पाळावा लागणार आहे. हॉल व रुमचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.
येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे तापमान मोजून प्रत्येकाला मास्क अनिवार्य करुनच आतमध्ये प्रवेश द्यावा. प्रवेशद्वारावर तसेच लॉन्स, मंगल कार्यालयात दर्जेदार सॅनिटायझरची व्यवस्था करावी. विवाह समारंभ परवानगीकरिता अर्ज क्रमांक-६ ची पूर्ण पूर्तता करून पोलीस आयुक्तालयात सर्व मंगल कार्यालय चालकांनी आपल्याकडे असलेल्या विवाह समारंभाच्या परवानगीसाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच विनापरवानगीशिवाय कुठलाही कार्यक्रम कार्यालयात करू नये असा ठोस निर्णय घेण्यात आला आहे.