गोरज मुहूर्तावर निर्बंधामुळे लॉन्स मंगल कार्यालये संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:22 AM2021-02-23T04:22:26+5:302021-02-23T04:22:26+5:30
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे गोरज मुहूर्तावर सायंकाळी होणारे रद्द करण्याच्या अथवा किमान उपस्थिती करण्याच्या सूचना ...
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंखेत वाढ होत असल्यामुळे गोरज मुहूर्तावर सायंकाळी होणारे रद्द करण्याच्या अथवा किमान उपस्थिती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्यानंतर शहरासह परिसरातील लॉन्स व मंगल कार्यालयांच्या या पूर्वी बूक केलेल्या तारखा रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे केटरर्स व्यवसायासह बँड पथके, फोटोग्राफर, इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेटर्स आदी विविध व्यवसायातील हजारो कामगारांचे रोजगारही संकटात आले आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन लॉन्स चालकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत गोरज मुुहूर्तावर पूर्वनियोजित विवाह सोहळे वेळेत करण्याचे आवाहन वधुवर पक्षांना केले आहे. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्याना आमंंत्रितांना वेगवेगळ्या टप्प्याने मर्यादित संख्येत बोलाविण्याचा सल्लाही दिला जात आहे. तर काही आयोजकांना गोरज मुहूर्ताचे विवाह सोहळे दुपारच्या वेळेत करण्याचेही आवाहन केले जात आहे. मात्र असे असतानाही अनेक आयोजकांकडून यापूर्वीच बूक केलेल्या तारखा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे लॉन्स चालकांसह विवाह सोहळ्यांवर आधारित विविध व्यावसायिकांसमोर संकट निर्माण झाले असून या क्षेत्रातील हजारो कामगारांच्या रोजगारांवर कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
इन्फो-
व्यावसायिकांना मार्चपासून २५० कोटींचे नुकसान
विवाह सोहळ्यावर लॉन्स व मंगल कार्यालयांसह केटरर्स, फोटोग्राफर, डेकोरेटर्स , इव्हेंट मॅनेजमेंट, बँड पथक, किराणा आदी विविध व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र २८ मार्च २०२० पासून टाळेबंदीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून या व्यावसायिकांना अकरा महिन्यात तब्बल २५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
कोट-१
लॉन्स चालकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका असून शासनाच्या नियमानुसार नियोजित वेळेत व किमान पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्याचे आवाहन वधुवर पक्षांना करण्यात येत आहे. अनेक कुटुंब यासाठी तयार होत असले तरी काहींचा तारखा पुढे ढकलण्याकडे अथवा रद्द करण्याकडे कल आहे. त्यामुळे लॉन्स व्यावसायिकांसमोर मोठ्या प्रमाणात संकटात उभे राहिले आहे.
-सुनील चोपडा, अध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालय संघटना
कोट-२
मागील टाळेबंदीनतर व्यावसाय रुळावर येत असताना पुन्हा निर्बंध लागून केल्याने लॉन्स व मंगल कार्यालय चालकांचे व्यावसाय अडचणी आले आहेत. शासनाने रेल्वे, बस, मॉल, थिएटर सुरू केले आहेत. या ठिकाणी हजारो लोक एकत्र येत असताना नियमांचे व पालनही होत नाही. असे असताना केवळ विवाह सोहळ्यांवरच निर्बंध का? तुलनेत लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा असल्याने फिजिकल डिस्टन्स व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होऊ शकते. त्यामुळे लॉन्स मंगल कार्यालयांमध्ये ५० टक्के क्षमतेने विवाह सोहळ्यांना परवानगी देण्याची गरज आहे.
-संदीप काकड, कार्याध्यक्ष, लॉन्स व मंगल कार्यालय संघटना
कोट-
लॉन्स व मंगल कार्यालय व्यावसायिकांची प्रशासनाला सहकार्याची भूमिका आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला कल्पनाही दिली आहे. परंतु, प्रशासनाकडून वधुवर कुटुंबीयांना व आयोजकांवरही नियंत्रणाच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. केवळ व्यावसायिकांना जबाबदार धरू नये. लॉन्स चालकांकडून वारंवार सूचना करूनही आयोजकांकडून नियमांचे पालन होत नसेल तर व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये.
- समाधान जेजूरकर, सह सचिव लॉन्स व मंगल कार्यालय संघटना