वनोद्यानाच्या नियमांचा पर्यटकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:10 PM2017-12-06T12:10:33+5:302017-12-06T12:15:33+5:30
नाशिक : टाटा ट्रस्ट व नाशिक महानगरपालिकेने विकसित केलेल्या व वनविकास महामंडळाकडे ताबा असलेल्या पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानात प्रवेश नियमांच्या गोंधळामुळे पर्यटकांना फटका बसत आहे.
साधारण वर्षभरापूर्वी पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या नेहरू वनोद्यानाचा (नक्षत्र उद्यान) टाटा ट्रस्टच्या मदतीने नूतनीकरण कथा अरण्याची हा प्रकाश योजनेचा लेझर शो आदी गोष्टींची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र येथे प्रवेशाच्या नियमावलीवरून गोंधळ असल्याचे निदर्शनास आले. उद्यान बघणाºयांसाठी प्रतिव्यक्ती तीस रुपये शुल्क असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच उद्यान बघू दिले जाते. नंतर त्यांना बाहेर घालविले जाते. लेझर शोसाठीची तिकीटविक्र ी सायंकाळी साडेसहाला सुरू होते. उद्यान व लेझर शोची एकत्रित तिकिटे दिली जात नसल्याने पर्यटकांची अडचण होत आहे. ज्यांना दोन्हींचा आनंद घ्यायचा आहे, त्यांना साडेपाच ते साडेसहा बाहेर रस्त्यावर थांबून रहावे लागते.
साडेसहा वाजता प्रथम सात वाजेच्या शोची तिकिटे दिली जातात. शो सुरू झाल्यावर आठच्या शोची बुकिंग सुरू केली जाते. सात वाजेचा शो सातला सुरू होणे अपेक्षित असताना सातच्या आतच सुरू केला जातो. सात ते साडेसात असा शो असूनही तो बावीस मिनिटांचाच असल्याचा तेथील कर्मचारी सांगतात. मात्र शो अठरा मिनिटांतच संपविला जातो, अशीदेखील काही नागरिकांची तक्रार आहे. प्रवेशद्वारावरचे तिकीट काउंटर ते लेझर शो हे अंतर खूप असल्याने शेवटच्या पर्यटकांना शोसाठी धावतपळत जावे लागते. तिथले कर्मचारी शो सुरू होत आहे, असे ओरडून सांगत असल्याने ही उद््घोषणेची कोणती पद्धत, असा सवाल उपस्थित केला जातो.