तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
By admin | Published: February 12, 2017 10:49 PM2017-02-12T22:49:26+5:302017-02-12T22:49:40+5:30
तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरू झाले असून, इंदिरानगर, पंचवटी व मुंबई पोलीस ठाणे परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सव्वापाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे़ या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे़
पंचवटीतील स्वामी नारायण मंदिरासमोरील अजंठा कॉम्प्लेक्समधील टायर विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चारचाकी व दुचाकी वाहनांचे टायर्स, १२ हजार रुपये रोख असा ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी तुषार सेजपाल (रा. धनश्री चेंबर्स, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगरच्या गजानन महाराज मंदिररोडवर असलेल्या रुद्रेश्वर अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे़ त्यामध्ये मंगळसूत्र, पोवळाहार, रिंगा, नथ, मुरणीचा समावेश होता़ या प्रकरणी कुटप्पा मंडिवळयाप्पा देसाई यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाभानगर परिसरातील रहिवासी मुजम्मीस शेख युसूफ यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६४ हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता.८) सकाळच्या सुमारास घडली़ चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंग, दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची साखळी व रोख रकमेचा समावेश आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.