सिन्नर बाजार समितीच्या सभापतिपदी लक्ष्मणराव शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 09:46 PM2020-11-20T21:46:54+5:302020-11-21T00:52:32+5:30
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली.
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली.
सिन्नर बाजार समितीवर आमदार माणिकराव कोकाटे गटाचे बहुमत आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती निवड बिनविरोध होण्याचे संकेत होते. त्यानुसार दोन्ही पदांची बिनविरोध निवड पार पडली. बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागांची निवड करण्यासाठी सहायक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक आर. बी. त्रिभुवन व बाजार समितीचे सचिव विजय विखे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. सभापतिपदासाठी लक्ष्मणराव शेळके यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते सभापती विनायक तांबे, तर विनायक घुमरे यांनी अनुमोदक म्हणून आणि उपसभापतिपदाच्या संजय खैरनार यांच्या अर्जावर सूचक म्हणून मावळते उपासभापती सुधाकर शिंदे यांनी सूचक म्हणून, तर संचालक सुनील घुमरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी एस. पी. रुद्राक्ष यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडणुकीत १८ संचालकांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी माजी सभापती व संचालक अरुण वाघ आणि संचालक दत्तात्रय सानप अनुपस्थित राहिले. सभापतिपदी शेळके, तर उपसभापतिपदी खैरनार यांची निवड जाहीर झाल्यानंतर कोकाटे समर्थकांनी जल्लोष केला. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक सोमनाथ भिसे, दत्तात्रय शेळके, सविता उगले, सुनीता बोऱ्हाडे, शांताराम कोकाटे, लता रूपवते, जगन्नाथ खैरनार, सुनील चकोर, पंढरीनाथ खैरनार, अनिल सांगळे, विजय सानप यांच्यासह आर. एन. जाधव व समर्थक उपस्थित होते.