मालेगावसह परिसरात लक्ष्मीपूजन उत्साहात
By admin | Published: October 31, 2016 12:49 AM2016-10-31T00:49:39+5:302016-10-31T01:10:28+5:30
आतषबाजी : रंगीबेरंगी विद्युत रोषणाई
मालेगाव : शहर परिसरात पारंपरिक पद्धतीने व अत्यंत उत्साहात दिवाळी सणानिमित्त नागरिकांनी मुहूर्त साधून अत्यंत मनोभावे लक्ष्मीपूजन केले.
शहरात गेल्या आठवडाभरापासून दीपावली सणाची लगबग वाढली असून, बाजारात खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी झाली आहे. विविध शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाकड जाण्याची लगबग सुरू आहे. शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. संगमेश्वरसह मोसमपूल भागात झेंडूच्या फुलांसह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरासह बाहेरगावच्या लोकांची वर्दळ वाढल्याने मोसमपूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत.
शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने व दुकानांमध्ये झेंडूंच्या फुलांचे तोरण लावून विधीवत पूजन करीत लक्ष्मीपूजन केले. लक्ष्मीपूजन होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. व्यापारी व महिलावर्गाकडून रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपूजन सुरू होते. दरम्यान, येत्या सोमवारी मराठी नववर्ष ‘पाडवा’ तसेच मंगळवारी ‘भाऊबीज’ असल्याने महिलांमध्ये माहेरी जाण्याची ओढ दिसून आली.
शहरात ठिकठिकाणी श्रीलक्ष्मीच्या मूर्तीचा दर हा किमान ७० ते १२५ रुपये प्रती नग असा होता. लक्ष्मी म्हणून पूजल्या जाणाऱ्या केरसुणीचा दर हा आकारानुसार २५ ते ५० रुपये एवढा होता. देवीच्या पूजेसाठी आसन, चुनरी, हळद, कुंकू, सुपारी, नारळ, अगरबत्ती, वात, कापूर, खारीक, बत्तासे, गुलाबजल आदि सामानाचे एकत्रित साहित्य याची विक्री किमान ४० ते ३५० रुपयांना होत आहे. पणत्या व आकाश कंदिलामुळे रोषणाईचा झगमगाट जाणवत होता. बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी झेंडू, शेवंती, गुलाब आदि फुलांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले होते. (प्रतिनिधी)