थरावर थर, नियम धाब्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:22 AM2019-08-22T01:22:16+5:302019-08-22T01:22:43+5:30

कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत.

  Layer by layer, rule by layer ... | थरावर थर, नियम धाब्यावर...

थरावर थर, नियम धाब्यावर...

Next

नाशिक : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक व्दिगुणित करण्यात येत असला तरी थरारवर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षिततेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या पाच वर्षांत नाशिक शहरातच पाच गोविंदा जायबंदी झाले आहेत. सुदैवाने गेल्या काही वर्षांत जीवित हानी झालेली नाही. तथापि, दुर्घटना टाळण्यासाठीच दहीहंडा करा, परंतु नियम पाळा असे सांगण्याची वेळ आली आहे.
दहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरुणाईत दिसून येतो. मुंबईच्या तुलनेत नाशिकमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान-मोठी सुमारे ४५ मंडळे उत्साहात साजरी करत असतात. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा या निमित्ताने असते. नाशिकमध्ये खास असे गोविंंदा पथक किंवा गोपिका पथक नसले तरी स्थानिक युवकांचे गटच ते फोडत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात इनामही लावले जाते. मात्र, नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली जात नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत असतात. काही वर्षांपूर्वी एका मुलाचा उंचावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर मोठी दुर्घटना घडली नसली तरी जायबंदी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर सहा गोविंदा गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले होते.
नाशिकची दहीहंडी;
मुंबईचे गोविंदा पथक
नाशिकमध्ये जुन्या नाशिकमधील भद्रकाली परिसरात तसेच पंचवटी गावठाणात अनेक जुनी मंडळे आहेत. याठिंकाणी पारंपरिक पध्दतीने दहीहंडी होते. मात्र नव्याने विकसित राजीवनगर, राणेनगर या भागात जरा व्यापक स्वरूपात दहीहंडी होते. कॉलेजरोड आणि गंगापूररोड भागात दहीहंडीला कार्पोरेट लूक असतो. त्यामुळे या भागात स्पर्धा वाढते. नाशिक शहरातील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने गोपाळकाल्यानंतर गोपिकांची दहीहंडी होते. त्यासाठी खास मुंबई आणि ठाण्यातून मुलींची पथके येतात. ते अनेक थरावर थर रचत असले तरी साधारण पाच ते सात थराच्या पलीकडे मात्र ते जात नाही. अर्थात, त्यासाठी सुरक्षितेबाबत दक्षता घेतली जाते. काही वर्षांपूर्वी स्पेनचे एक खास पथकही नाशिकमध्ये दहीदंडीसाठी दाखल झाले होते.
अशी आहे नियमावली
१८ वर्षाखालील गोविंदाचा सहभाग नसावा.
१७ फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.
सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.
मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करू नये.
कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.
कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.
दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डीजेचा वापर शक्यतो टाळावा.
आपत्कालीन व्यवस्था असावी.

 

Web Title:   Layer by layer, rule by layer ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.