स्वामीनारायण मंदिराच्या गर्भगृह द्वाराची पायाभरणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:20 AM2021-09-16T04:20:19+5:302021-09-16T04:20:19+5:30
नाशिक : केवडी बनात तीन एकरांहून अधिक विस्तीर्ण क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वाराच्या पायाभरणीचा बुधवारी ...
नाशिक : केवडी बनात तीन एकरांहून अधिक विस्तीर्ण क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वाराच्या पायाभरणीचा बुधवारी मुहूर्त करण्यात आला. बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे मुंबईचे अभयस्वामी आणि अहमदाबादचे अक्षय मुनी स्वामीजी यांच्या हस्ते या प्रस्तावित भव्य मंदिराच्या गर्भगृह प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले.
कन्नमवार पुलानजीकच्या डेंटल कॉलेजजवळच्या भागात या भव्य मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू आहे. २००३ साली झालेल्या कुंभमेळ्यात संस्थेचे तत्कालीन प्रमुख स्वामी महाराज यांनी नाशिकच्या तीर्थक्षेत्री मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यावेळी प्रमुख स्वामी महाराजांनी याच भागातील छोट्या जागेत मूर्तीची स्थापनादेखील केली होती. त्याच संकल्पाच्या पूर्ततेसाठी वर्तमान गुरू महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने गत दोन वर्षांपासून भव्य मंदिर उभारणीच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असून, निम्म्याहून अधिक काम पूर्णदेखील झाले आहे. या मंदिराच्याच जागेत २००३ आणि २०१५ च्या कुंभमेळ्यासाठी संतनिवास, भंडारा, वैद्यकीय शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. गर्भगृह द्वार पायाभरणीप्रसंगी बीएपीएस स्वामीनारायण मंदिर परिवाराचे सर्व संतगण, ट्रस्टी आणि भक्त परिवारातील मोजके मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
पुढील वर्षी मंदिराचे लोकार्पण
नाशिकला उभारण्यात येत असलेल्या या मंदिराचे कामकाज पुढील वर्षी पूर्णत्वाला येणार असून, त्यानंतर मंदिर सर्व नागरिकांसाठी खुले होणार आहे. मंदिराचे बांधकाम भूकंपरोधक तत्त्वावर असून, किमान एक हजारहून अधिक वर्ष मंदिराच्या कामाला कोणताही धोका होणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
इन्फो
भव्य ५ हजार खांब
या मंदिरात ५ हजारांहूून अधिक खांब उभारण्यात येत आहेत. या खांबांवर संपूर्ण रामायणातील प्रमुख कथांचे चित्रण, भगवान स्वामीनारायण यांचे जीवनचरित्र, शंकर भगवान यांची कथा साकारण्यात येणार आहे. एकेका अखंड खांबावर अत्यंत बारकाईने या सर्व कथा प्रत्यक्ष थ्री डायमेन्नान शिल्पकलेद्वारे साकारण्यात येत आहेत.
फोटो
१५पीएचएसपी ७१