एलबीटी वसुली संथगतीने
By admin | Published: December 16, 2014 02:09 AM2014-12-16T02:09:07+5:302014-12-16T02:09:31+5:30
एलबीटी वसुली संथगतीने
नाशिक : मुलाखतीचा दिवस निघून जातो, त्यानंतर उमेदवाराच्या हाती कॉल लेटर देण्याचा पराक्रम टपाल खात्याने वारंवार गाजविल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. परंतु पोस्टामुळे एखाद्या महापालिकेची करवसुली थंडावल्याचे कधी ऐकिवात नाही. नाशिक महापालिका मात्र हा अनुभव घेत आहे. महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी थकबाकीदारांना पाठविलेल्या दंडाच्या नोटिसाच संबंधित व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचत नसल्याने आणि त्याबाबतची पोचही पालिकेकडे प्राप्त होत नसल्याने संबंधित व्यापाऱ्यांवरील कारवाईला विलंब लागत असून, परिणामी एलबीटी वसुली संथगतीने होत आहे. या घोळाबाबत आता पालिकेनेच टपाल खात्याला विचारणा केली असून, अन्य पर्यायांचाही विचार सुरू केला आहे.व्यापाऱ्यांच्या असहकारामुळे पालिकेच्या करवसुलीत अडथळे निर्माण होत आहेत. एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी आणि विवरणपत्र मुदतीत न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कठोर पाऊले उचलली आहेत. त्यानुसार महापालिकेने १४ हजार २०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या, तर आतापर्यंत ९०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याची कारवाई केली आहे. महापालिकेने करवसुली व विवरणपत्राबाबत सुमारे सात हजार व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या. या नोटिसा टपाल खात्यामार्फत शहरात वितरित केल्या गेल्या. त्यानंतर महापालिकेने व्यापाऱ्यांना दंडात्मक कारवाईसंबंधी आणि दंड न भरल्यास बॅँक खाती सील करण्यासंबंधी नोटिसा बजावण्यासाठी त्या टपाल विभागाकडे सुपूर्द केल्या. परंतु दुसरी नोटीस व्यापाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतच नसल्याचे आणि त्याबाबतची पोचही टपाल विभागाकडून पालिकेला प्राप्त होत नसल्याने एलबीटी विभागाकडून पुढील कारवाईला ब्रेक बसत आहे. दुसरी नोटीस संबंधित व्यापारी-व्यावसायिकाने स्वीकारल्यानंतर त्याची पोच मिळाल्यानंतरच पालिका पुढील कारवाई करते. त्यामुळे पुढच्या टप्प्यातील व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात अडथळे उत्पन्न होत आहेत. टपाल विभागाच्या या घोळाबाबत पालिकेनेच आता टपाल विभागाला विचारणा केली आहे. टपाल विभागाकडून रजिस्टर पोस्टाने नोटिसा वितरित केल्या जातात. परंतु नोटिसाच पोहोचत नसल्याने टपाल विभागातील कर्मचारी व व्यापारी यांच्यात संगनमत आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.