एलबीटीची वाटचाल ५०० कोटींकडे
By admin | Published: December 23, 2014 12:36 AM2014-12-23T00:36:49+5:302014-12-23T00:37:07+5:30
एलबीटीची वाटचाल ५०० कोटींकडे
नाशिक : एलबीटीच्या माध्यमातून महापालिकेच्या खजिन्यात २२ डिसेंबरअखेर ४७९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून, डिसेंबरअखेर एलबीटी ५०० कोटींपर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापालिकेने एलबीटीची थकबाकी न भरणाऱ्या आणि विवरणपत्र सादर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्धची कारवाई स्थगित केली असून, ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एलबीटी व विवरणपत्र भरणाऱ्या ३१५ व्यापाऱ्यांची बॅँक खाती पूर्ववत खुली करण्यात आल्याची माहिती कर उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.
महापालिकेने मार्चअखेर एलबीटीच्या माध्यमातून ६२० कोटी रुपयांचे सुधारित उद्दिष्ट्य समोर ठेवले आहे. २२ डिसेंबरअखेर महापालिकेकडे एलबीटीच्या माध्यमातून ४७९ कोटी रुपये जमा झाले आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ३७ कोटी ५९ लाख रुपये जमा झाले असून, डिसेंबरअखेरपर्यंत त्यात आणखी २० ते २२ कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता असल्याने एलबीटीची ५०० कोटींकडे वाटचाल सुरू आहे.