एलबीटी अनुदानात कपात; देयकांचे होणार फेरनियोजन
By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:27+5:302016-01-02T08:34:06+5:30
महापालिका : अर्थसंकटामुळे प्रशासनाची धावपळ
नाशिक : महापालिकेला एलबीटीच्या मोबदल्यात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४० कोटी रुपयांनी कपात होणार असल्याने महापालिकेवर येऊ पाहणारे अर्थसंकट पाहता प्रशासनाने विविध कामांच्या देयकांचे फेरनियोजन करण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्य शासनाने आॅगस्ट २०१५ पासून पन्नास कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द केल्यानंतर त्या मोबदल्यात महापालिकेसाठी सहायक अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेला आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या कालावधीत दरमहा ४५ कोटी ८६ लाख रुपयांची रक्कम अनुदान स्वरूपात अदा करण्यात आली. याशिवाय, दरमहा सुमारे ५ कोटी रुपये एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराच्या माध्यमातूनही अदा केला जात आहे. दरम्यान, महापालिकेने ५० कोटी रुपयांवरील उलाढालीतून दरमहा सुमारे ३३ ते ३५ कोटी रुपये एलबीटी वसुली केल्याने महापालिकेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ७५१ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली गेली आहे. परिणामी, राज्य शासनाने जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या एलबीटी अनुदानात कपात करत ती दरमहा ५ कोटी १३ लाख रुपयांवर आणली. त्यामुळे महापालिकेला मोठा फटका बसणार आहे. एलबीटीपोटी मनपाची वसुली ८२५ ते ८४० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.