निवडणुकीसाठी नेत्यांचे ठाण, नाशकात निवासस्थान
By admin | Published: February 3, 2017 01:05 AM2017-02-03T01:05:28+5:302017-02-03T01:05:45+5:30
तात्पुरते सदन : गिरीश महाजन, नरेंद्र पवार यांचे शहरामध्ये वास्तव्य
नाशिक : सर्वच राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आता नाशिकमध्ये ठाण मांडत असून, त्यासाठी काहींनी तर तात्पुरत्या स्वरूपात सदनिका वापरण्यास घेतल्या आहेत. विशेष म्हणजे एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेदेखील शहरात दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या प्रभागातच दोन सदनिका भाड्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणुका आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, एकदा सत्ता दिली की नाशिकला ठाण मांडून प्रश्न सोडवू आणि विकास करू, असे सांगतात. तथापि, आता निवडणुकीच्या कामासाठीच नाशिकमध्ये ठाण मांडावे लागणार असून तशी तयारी केली जात आहे. निवडणुकीसाठी ज्यांच्याकडे सूत्रे आहेत, असे नेते मुंबई, जळगाव, अहमदनगर, ठाणे परिसरातील आहेत. भाजपाचे नेते तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवडणूक आचारसंहितेमुळे शासकीय निवासस्थानी वास्तव्य करणे शक्य नसल्याने त्यांनी त्र्यंबकरोडवर स्प्लेंडर रेसिडेन्सीत एका कार्यकर्त्याच्या सदनिका वापरण्यासाठी घेतली आहे. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाच्या पलीकडे तेथेच निवडणूक हालचालीचे केंद्र असून तेथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि आमदारांच्या बैठका होत आहेत. भाजपाचे आणखी एक कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली असून त्यासाठी त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिराजवळ सदनिका वापरण्यासाठी घेतली आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांचादेखील असाच शोध सुरू केल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपाचा कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने प्रभाग १५ आणि प्रभाग तीनमध्ये खास निवासस्थान भाड्याने घेतल्याचे समजते. भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या सुपुत्रांना पराभूत करण्यासाठी सदरचा नेता ठाण मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नेत्यांच्या मुक्कामामुळे नाशिकच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)