संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील लोकनेते : अण्णा भाऊ साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:00 AM2019-08-01T01:00:39+5:302019-08-01T01:01:43+5:30

स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.

Leader of the United Maharashtra Movement: Anna Bhau Sathe | संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील लोकनेते : अण्णा भाऊ साठे

संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील लोकनेते : अण्णा भाऊ साठे

googlenewsNext
ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील योगदान लक्षणीय ठरते.

स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. त्यांच्यासह अन्य शाहिरांनीही महाराष्टÑातील जनचळवळीला सातत्याने स्फूर्ती दिली. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत शाहिरांच्या वाणी, लेखणीने समाजमनात क्रांतीच्या ठिणग्या पडत होत्या. म्हणूनच अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील योगदान लक्षणीय ठरते.
शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ आॅगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अनुभवाच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. पोटापाण्यासाठी अण्णा मुंबईला आले. तेथून त्यांच्या साहित्य प्रवासाला गती मिळाली. अण्णांनी कथा, कादंबऱ्या, नाटके, प्रवासवर्णनं, पोवाडे, लावणी, लोकनाट्य या सर्व वाङ्मयाचे लेखन केले.
अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्टÑप्रेम त्यांच्या विविध रचनेतून आपणास जाणवते.
ही भूमी असे कैकांची। संत महंताची।
ज्ञानवंताची नररत्नाला जन्म देणार।। जी जी
या पोवाड्यातून तसेच
महाराष्टÑ देशा आमच्या महाराष्टÑ देशा।
आनंदवनभुवन तू भूवरी भूषणी भारतवर्षा।।
अशा शाहिरीगीतांतून अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्टÑाला भारताचे भूषण मानले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीने त्या काळातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यातूनच १९४६ साली अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांनी ‘लाल बावटा’ या कलापथकाची स्थापना केली. आणि त्या कलापथकाने १९५०-१९६० या काळात संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीची हाक बुलंद केली.
‘माझी मुंबई’ हे अण्णांचे गाजलेले लोकनाट्य म्हणजे संयुक्त महाराष्टÑातील चळवळीचे प्रेरणा गीतच ठरले होते. शाहिरीतून अण्णा संघर्षाच्या ठिणग्या पेरतात याची धास्ती घेतलेल्या देसाई सरकारने अण्णांच्या कार्यक्रमावर बंदी घातली; परंतु अण्णा भाऊ साठे यांनी मोठ्या चातुर्याने तमाशाचे नामांतर ‘लोकनाट्य’ असे केले. आणि मुंबईत संयुक्त महाराष्टÑ परिषदेत शिवाजी पार्क मैदानावर हजारो लोकांसमोर माझी मुंबई हे संयुक्त महाराष्टÑाच्या संदर्भातील लोकनाट्य घुमले. त्याचा एवढा प्रभाव पडला की भिंतीवरच्या पोस्टर्समधून, घोषणांमधून, सभांमधून हे घोषवाक्यच होऊन बसले. माझी मुंबई या लोकनाट्यात विष्णू हा मराठी कामगार व मुनिमजी हा गुजराथी बनिया यांच्यातील संवाद असून, ‘मुंबई कोणाची’ या विषयीची जुगलबंदी म्हणजे हे लोकनाट्य आहे. ज्याप्रमाणे पंखाशिवाय गरूड नाही, नखाशिवाय वाघाचे अस्तित्व नाही तशीच मुंबईशिवाय महाराष्टÑाची कल्पनाच होऊ शकत नाही हा दुर्दम्य आत्मविश्वास अण्णांनी मराठी माणसांच्या मनामनात प्रज्वलित केला.
‘माझी मैना गावावर राहिली’ या अण्णा भाऊ साठे यांच्या लावणीतील नायक आपल्या पत्नीच्या सौंदर्याचे वर्णन करतो व विरहाने व्याकूळ होतो अशी सौंदर्यवादी वाटणारी ही लावणी अलगदपणे आपल्या संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीच्या दृष्टीने चिंतनाकडे घेऊन जाते. आणि द्वैभाषिक मुंबई राज्यातही नसलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग हा भाग महाराष्टÑापासून तोडल्याने खंडित महाराष्टÑाची अवस्था कशी झाली होती हे सांगतात. अशा पद्धतीने बेळगाव, कारवार, निपाणी तसेच डांग, उंबरगाव या भागातील मराठीजणांचे दु:ख अण्णांनी त्यावेळीच मांडले होते. याच लावणीत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्टÑाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकतेने लढा चालू ठेवावा, असे आवाहन केले.
अण्णा भाऊ साठे हे कलावंत म्हणून तसेच कम्युनिस्ट चळवळीचे नेते व लेखक म्हणून सर्वांगाने संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत अग्रेसर राहिले. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर व अण्णा या त्रिकुटाने पोलिसांची नजर चुकवून, शासनाचा बंदीहुकूम मोडून आपल्या शाहिरी व लोकनाट्यातून समाजमन जागृत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ ला महानिर्वाण झाल्यानंतर अण्णांनी ‘जग बदल घालूनी घाव’ ही रचना लिहिली. त्याही रचनेत अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्टÑनिर्मितीच्या विचारांची छाप दिसून येते. नवमहाराष्टÑाच्या निर्मितीच्या या कार्यात एकजुटीने पुढे येण्याची हाक मराठी माणसांना देताना अण्णा म्हणतात-
एकजुटीच्या या रथावरती।
आरुढ होऊन चलबा पुढती।।
नव महाराष्टÑ निर्मून जगती।
करी प्रकट निज धाव।।
जग बदल घालुनी घाव।
सांगून गेले मज भीमराव।।
अखेर संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीपुढे केंद्र सरकार नमले. २८ मार्च १९६० रोजी गृहमंत्री गोविंद वल्लभपंत यांनी लोकसभेत द्वैभाषिक राज्य भंग करण्याचे बिल मांडले. २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेने आणि २३ एप्रिल १९६० रोजी राज्यसभेने या बिलाला मंजुरी दिली व त्यानुसार १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे मुंबई हे राजधानी असणारे महाराष्टÑ आणि गुजराथी भाषिकांचे गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये उदयास आली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार व कार्याचे स्मरण करणे आणि महाराष्टÑाचे सुराज्य निर्माण करणे हीच अण्णांना आदरांजली ठरेल.
- डॉ. सोमनाथ डी. कदम

Web Title: Leader of the United Maharashtra Movement: Anna Bhau Sathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक