पुढारी आणि मंत्री हे तर जनतेचे जनरल फिजिशियन : गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 01:14 AM2022-03-12T01:14:32+5:302022-03-12T01:15:03+5:30
कोरोना काळात अनेक नातेवाइकांनी मृत पावलेल्या लोकांकडे पाठ फिरविल्याचे आपण पाहिले आहे. गडगंज पैसे असणारे लोकही लाटेतून वाचू शकले नाहीत, हे कटू सत्य आहे. अशा वेळी डॉक्टर हेच रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सेवा देत होते. असे असताना डॉक्टर व पुढारी म्हणजे पैसे खाणारे आहेत, हे म्हणणे चुकीचे आहे. बरेच पुढारी चांगल्या लोकांत राहतात. आम्ही दररोज ३२ लग्नांना हजेरी लावतो आणि लोकांमध्ये राहतो, म्हणून पुढारी आणि मंत्री हे जनतेचे जनरल फिजिशियन असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
लासलगाव : कोरोना काळात अनेक नातेवाइकांनी मृत पावलेल्या लोकांकडे पाठ फिरविल्याचे आपण पाहिले आहे. गडगंज पैसे असणारे लोकही लाटेतून वाचू शकले नाहीत, हे कटू सत्य आहे. अशा वेळी डॉक्टर हेच रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सेवा देत होते. असे असताना डॉक्टर व पुढारी म्हणजे पैसे खाणारे आहेत, हे म्हणणे चुकीचे आहे. बरेच पुढारी चांगल्या लोकांत राहतात. आम्ही दररोज ३२ लग्नांना हजेरी लावतो आणि लोकांमध्ये राहतो, म्हणून पुढारी आणि मंत्री हे जनतेचे जनरल फिजिशियन असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
लासलगाव येथे एका खासगी कार्यक्रमप्रसंगी त्यांनी उपरोक्त विधान केले. पाटील पुढे म्हणाले, मी पाणीपुरवठामंत्री असूनही लासलगाव येथे पाणी प्रश्नाची समस्या असताना, पावसाने माझी पाठ सोडली नाही, असे सांगताच हंशा पिकला. राजकारणी लोकांनी पथ्य पाळले पाहिजे. मी १९८२ साली पानपट्टी चालविली. आज मंत्री आहे. आम्ही सायकलवर प्रचार केले आहेत, त्याची दखल घेतली गेली, असे सांगून, पाणी वाहते असेल, तर डास होत नाहीत. त्यामुळे लोकांनी बदलते राहिले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.
प्रारंभीच सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सोळा कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिल्याबद्दल, शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी त्यांना धन्यवाद दिले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, कुणाल दराडे, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप आदी उपस्थित होते.