बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांची तारेवरची कसरत
By admin | Published: February 13, 2017 12:19 AM2017-02-13T00:19:16+5:302017-02-13T00:19:27+5:30
बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांची तारेवरची कसरत
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी (दि.१३) माघारीची अंतिम मुदत असून, तुल्यबळ बंडखोरांबरोबरच इतर अपक्ष उमेदवारांची माघारीसाठी मनधरणी करताना राजकीय पक्षांचे उमेदवार आणि नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. समजूत घातलेले आणि माघारीसाठी तयार झालेल्या उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत जातील किंवा नाही याची धास्ती अनेकांना लागून राहिली आहे. उमेदवारी माघारीसाठी एकच दिवस ठेवण्यात आल्याने सोमवारी तहसील कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिक महापालिकेसाठी चार दिवस उमेदवारांनी माघार घेतली; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अर्ज माघारीची मुदत जरी ८ ते १३ फेब्रुवारी असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एकच दिवस देण्यात आला आहे. एकाच दिवशी माघार असल्याने सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज एकाच दिवशी मागे घेण्यात येणार असल्याने राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना अपक्षांच्या तसेच बंडखोरांच्या माघारीसाठी चांगलीच धावपळ करावी लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकीय पक्षांचे नेते आणि अधिकृत उमेदवार बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करण्याबरोबरच त्यांना विविध आश्वासनेही देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. हे प्रयत्न आज माघारीनंतर सफल होतील की नाही असा प्रश्नही अनेकांना सतावत
आहे. (प्रतिनिधी)