लेकींच्या जन्मदरात आदिवासी तालुका अग्रणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:52 PM2020-01-02T23:52:47+5:302020-01-02T23:53:21+5:30
रामदास शिंदे । पेठ : मुलगी ही धनाची पेटी असते. लक्ष्मीच्या पावलांनी मुलीचे स्वागत. मुलगी झाली प्रगती झाली, ही ...
रामदास शिंदे ।
पेठ : मुलगी ही धनाची पेटी असते. लक्ष्मीच्या पावलांनी मुलीचे स्वागत. मुलगी झाली प्रगती झाली, ही वाक्य कायम कानावर पडत असली तरी प्रत्यक्ष स्थिती मात्र विदारक असून, स्वत:ला उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या भागात वंशाचा दिवा लावण्याच्या नादात गर्भातच कोवळ्या कळ्यांचा नाश केला जात आहे. अशास्थितीत पेठ तालुक्याने मुलींचा जन्मदर प्रमाणात जिल्ह्यात दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
वाढती महागाई, बेरोजगारी, जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे प्रत्येक कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरउपयोग करत मुलींना गर्भातच गळा घोटून जीव घेणारी कृतघ्न माणसं पहावयास मिळत असतात. दुर्दैवाने यामध्ये शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मात्र ग्रामीण व आदिवासी भागाने अशा कृतघ्न समाजाला सणसणीत चपराक देत
मुलींच्या जन्मदरात आघाडी घेतली आहे. मागील वर्षभरात पेठ तालुक्यात अंदाजे २३७२ जन्म झाले असून, त्यामध्ये ११९१ मुले तर ११८१ मुली जन्माला आल्या आहेत. दर हजारी मुलींच्या जन्माचे प्रमाण ९९२ असून, ९९९च्या संख्येने कळवण तालुका अव्वल आहे.
मुलींच्या जन्माचे स्वागत
मुलगा-मुलगी एक समान या सामाजिक भावनेने ग्रामीण भागात मुलांइतकेच मुलीच्या जन्माचेही जंगी स्वागत केले जाते. मुलं ही देवाघरची फुलं, देवानं दिलेली ती देणगी असते, या भावनेतून आदिवासी बांधव कधीही गर्भ तपासणी करत नाहीत. स्वत:ला उच्चशिक्षित म्हणून घेणाºया उच्चभ्रू समाजासमोर हा आदर्श आहे. केवळ वंशाचा दिवा म्हणून मुलींची गर्भातच हत्या करणाºया आणि अशा प्रकारच्या घातक बाबींना साथ देणाºया यंत्रणेलाही आता सुधारण्याची गरज असल्याचे यातून दिसून येते.