ऑक्सिजन गळती शोधण्यासाठी आता लीकेज डिटेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:46+5:302021-05-22T04:14:46+5:30
नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रौग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने धडा घेतला असून ज्या ठिकाणी ऑक्सिजन ...
नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रौग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने धडा घेतला असून ज्या ठिकाणी ऑक्सिजन टाक्या आहेत अशा सर्वच ठिकाणी लीकेज डिटेक्टर बसवण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात एका कंपनीला महापालिकेने प्रात्याक्षिक सादर करण्यास सांगितले आहे. हा प्रयोग योग्य असेल तर डॉ. झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयात अशा प्रकारचे उपकरण बसविण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात २१ तारखेला महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून रुग्णालयात वेपोरायझरमध्ये पाठवण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पाईपला गळती लागली आणि त्यानंतर महापालिकेची धावपळ उडाली. ठेकेदार कंपनीचे कर्मचारी ही गळती थांबवण्यात अयशस्वी ठरले. त्यानंतर प्रशासनाने अन्य ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांचे तंत्रज्ञ बोलावून त्यांच्याकडून गळती थांबवली होती.
ऑक्सिजन पुरवणाऱ्या पाईपला गळती कशी काय लागली याबाबत अनेक तर्कवितर्क असून नक्की कशामुळे हा प्रकार घडला याचे तांत्रिक कारण शोधले जात आहे. मात्र, अशाप्रकारे पुन्हा दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाय केले जात आहेत. त्यातच अशाप्रकार गळती हेाऊ लागता क्षणीच तत्काळ त्यांची माहिती स्वयंचलित पद्धतीने अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पोहोचेल अशी यंत्रणा उपलब्ध होत आहे. लीकेज डिटेक्टरशी संबंधित जितके मोबाईल आहेत, त्यावर गळती सुरू झाल्याचा अलर्ट येईल, त्यामुळे आपात्काळाची कल्पना आल्यानंतर प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय होईल अशी ही व्यवस्था आहे. महापालिकर त्याची आधी चाचणी करणार असून ते उपयुक्त ठरल्यास त्याचा वापर करण्यात येणार आहे.
कोट...
मुंबईतील एका रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला एका ऑक्सिजन सिलिंडरला हे उपकरण जोडून चाचणी देण्यास सांगण्यात आले आहे. ते योग्य निघाल्यास ते रुग्णालयात बसवण्याबाबत विचार करण्यात येईल.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका