किमान ७० टक्के आश्रमशाळा सुरु होण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 02:01 AM2021-08-02T02:01:01+5:302021-08-02T02:01:54+5:30
राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती महत्त्वाची असल्याने याला पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे.
नाशिक : राज्यातील आश्रमशाळा २ ऑगस्टपासून सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने प्रकल्पस्तरावर शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली असून ज्या ठिकाणी कोणतीही अडचणी नाही अशा ठिकाणी सोमवारपासून आश्रमशाळा सुरु होण्याची शक्यता आहे; मात्र मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती महत्त्वाची असल्याने याला पालकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढील भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, बहुतांशी शाळांमध्ये सोमवारपासून विद्यार्थी दाखल होण्यास प्रारंभ होईल त्यामुळे ७० ते ८० टक्के शाळा सुरु होण्यास फारसी अडचण येणार नसल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. ज्या गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि आश्रमशाळा असलेल्या गावात महिनाभरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही अशा ठिकाणी २ ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाला दिले आहेत. यादृष्टीने प्रकल्प स्तरावर त्याची कार्यवाही सुरु झाली आहे. प्रकल्प कार्यालयाकडून सर्व आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना या संबंधीचे पत्र पाठविण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे ठराव करण्याचे काम मुख्याध्यापकांनी सुरु केले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि संबंधित ठिकाणचे आरोग्य केंद्र यांच्या संमतीचे पत्र सादर केल्यानंतर शाळा सुरु करण्यास प्रकल्पस्तरावरुन मान्यता देण्यात येणार आहे. या प्रक्रियेला किमान दोन-तीन दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष शाळेच्या कामकाजाला सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. ज्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही अशा ठिकाणी सोमवारपासून विद्यार्थी येण्यास प्रारंभ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
चौकट-
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा निवासी असल्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र महत्त्वाचे आहे. काही पालकांमध्ये अद्याप कोरोनाची भीती कायम असल्यामुळे ते पाल्यांंना शाळेत पाठविण्यास कितपत सकारात्मकता दाखवितात यावरच पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून आरोग्याच्या खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.